अमेरिकेत २ कोटी लोक बेरोजगार; पोट भरण्यासाठी फूड बँकांवर अवलंबून

अमेरिकेत २ कोटी लोक बेरोजगार; पोट भरण्यासाठी फूड बँकांवर अवलंबून

कोरोना विषाणूमुळे अमेरिकेची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील विविध राज्यात लॉकडाऊन आहे, त्यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले असून २.२ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. अमेरिकेत कोरोना विषाणूचे आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ९३८ रुग्ण आढळले आहेत आणि ४२ हजार ५१८ जणांनी आपला जीव गमावला आहे. अमेरिकेत लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या लोकांचे जेवणाचे हाल झाले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. नागरिक फूड बॅंकेच्या बाहेर आपला नंबर येण्याची वाट पाहत आहेत. लॉकडाऊन दरम्यान कठोर निर्बंधामुळे लोक अन्न आणि पेय यासाठी देणगीदारांवर अवलंबून आहेत. फूड बॅंकेच्या बाहेर रांगाच रांगा लागल्या आहेत. अमेरिकेतील ही परिस्थिती अमेरिकेसाठी चिंताजनक आहे.

लॉकडाऊननंतर पेनसिल्व्हेनियाच्या ग्रेटर पिट्सबर्ग कम्युनिटी फूड बँकेत मार्चमध्ये फूड पॅकेटची मागणी ४० टक्क्यांनी वाढली. या फूड बँकेच्या बाहेर जवळपास हजाराहून अधिक गाड्या उभ्या आहेत. तसंच विविध ८ वितरण केंद्रात सुमारे २२७ टन खाद्य पदार्थांची पाकिटं वाटली जात आहेत. ही सेवा अनेकजण घेत आहेत. यात अशा लोकांचा समावेश आहे ज्यांना हा पहिला अनुभव आहे. यापूर्वी अशी वाईट परिस्थिती त्यांनी कधी पाहिली नव्हती, असं ग्रेटर पिट्सबर्ग कम्युनिटी फूड बँक या संस्थेचे उपाध्यक्ष ब्रायन गुलिश यांनी म्हटलं. ते पुढे म्हणाले की, नैऋत्य पेनसिल्व्हेनिया येथे ३५० फूड बँका आहेत आणि लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही, म्हणून लोक एकाच केंद्रावर येत आहेत. हेच कारण आहे की काही केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. न्यू ऑर्लीयन्स पासून डेट्रॉईट पर्यंत संपूर्ण अमेरिकेत लोक बेरोजगार झाल्यानंतर फूड बँककडे वळले आहेत.


हेही वाचा – Coronavirus: वुहानचं सत्य बाहेर आणणारे ३ पत्रकार बेपत्ता


एका वृत्तसंस्थेनुसार, बोस्टन चेल्सी येथील अन्न वितरण केंद्राबाहेर उभी असलेली एलेना नावाची महिला म्हणाली, “आमच्याकडे अनेक महिन्यांपासून काम नाही.” पुढे म्हणाली की, तिच्यासारख्या इतरही अनेकजण स्वतःचं पोट भरण्यासाठी अशा फूड बँकवर अवलंबून आहेत. देशातील फूड बॅंकांना मदत करण्यासाठी काही मोठे उद्योजकही पुढे आले आहेत. यात जेफ बेजो यांचं देखील नाव आहे.

 

First Published on: April 21, 2020 4:21 PM
Exit mobile version