29 दिवसांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात उडाली खळबळ

जगभरात कोरोना विषाणूचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीये. चीनमध्ये सध्या कोरोनाचं वातावरण निर्माण झालं आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे निर्माण झाले आहे. BF.7 व्हेरियंटचा धोकाही देशात वाढला आहे. दरम्यान, 29 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली असून आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

पंजाबच्या फिल्लौर भागात 29 दिवसांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलं आहे. बाळाच्या नातेवाईकांनी बाळाला तपासणीसाठी रुग्णालयात आणलं होतं. एका खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी त्याची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यावेळी त्याला कोरोना असल्याची पुष्टी झाली आहे. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी बाळाला उपचारासाठी लुधियानाच्या दीप रुग्णालयात नेलं.

सिव्हिल सर्जन डॉ. रमण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाचे पथक बाळाच्या नातेवाईकांशी संपर्क साधत आहेत. बाळाच्या आईला ताप आणि कोरोनाची लक्षणं होती. त्यांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. लुधियानात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81 हजार 157 वर पोहोचली आहे. RBSK अंतर्गत तैनात करण्यात आलेल्या पथकांची बैठक घेतल्यानंतर मुलांची 100 टक्के आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात आज 214 नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 509 वर पोहोचली आहे. एकूण संक्रमणांपैकी 0.01 टक्के रुग्ण सक्रिय आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्क्यांवर पोहोचला आहे.


हेही वाचा : राहुल गांधींची यात्रा आता जानव्यावरून ट्रोल; नेमकं काय घडलं?


 

First Published on: January 7, 2023 7:30 PM
Exit mobile version