नायजेरियात बसच्या भीषण धडकेत 37 ठार, चार दिवसांतील तिसरा मोठा अपघात

नायजेरियात बसच्या भीषण धडकेत 37 ठार, चार दिवसांतील तिसरा मोठा अपघात

नायजेरियाच्या ईशान्येकडील मैदुगुरी शहराबाहेर तीन बसची एकमेकांना धडक बसून किमान 37 लोक ठार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे, अशी माहिती नायजेरिया देशाच्या रस्ते सुरक्षा संस्थेने दिली आहे. दोन व्यावसायिक बसची समोरासमोर टक्कर होऊन आग लागल्याने हा अपघात झाला. दरम्यान, त्यानंतर तिसर्‍या बसने त्यांना धडक दिली, असंही बोर्नो राज्याच्या रस्ता सुरक्षा एजन्सीचे प्रमुख उताने बोई यांनी सांगितले.

“बसच्या अपघातात आतापर्यंत 37 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यापैकी बहुतेकांची ओळख अद्याप पटलेली नाही, कारण ते पूर्णपणे जळाले आहेत,” असंही बोई म्हणाले. बोर्नो राज्याची राजधानी असलेल्या मैदुगुरीपासून 35 किलोमीटर (20 मैल) अंतरावर असलेल्या जकाना गावाजवळ हा भीषण अपघात झाला. एका बसचा टायर फुटून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर धडकल्याने ही दुर्घटना घडली.

मृतदेह एकत्रितपणे दफन केले जाणार

फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या सेक्टर कमांडरने पत्रकारांना सांगितले की, हा अपघात वाहनांच्या भरधाव वेगामुळे झाला आहे. “एका बसचे नियंत्रण सुटले आणि ती उलटून दुसऱ्या बसवर आदळली.” बुधवारी (२३ नोव्हेंबर) प्रशासनाच्या देखरेखीखाली मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रस्त्यावर अपघात सामान्य आहेत

आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नायजेरियाच्या खराब रस्त्यांवर अपघात सामान्य आहेत, मुख्यत्वे वेगाने आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे अपघात घडत आहेत. याआधी मंगळवारी नायजेरियाची राजधानी अबुजाजवळ बसची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात 17 जण ठार तर चार जखमी झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुर्घटनाग्रस्त व्यक्ती ईशान्य गोम्बे राज्यातून प्रवास करीत होते. तसेच, शनिवारी उत्तरेकडील कानो शहराबाहेर टायर फुटल्याने ओव्हरलोड कार धरणात पडल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचाः कोकणातील रिफायनरीला आता ठाकरे गटाचाही पाठिंबा, राजन साळवींनी मांडली भूमिका

First Published on: November 23, 2022 12:38 PM
Exit mobile version