घरमहाराष्ट्रकोकणातील रिफायनरीला आता ठाकरे गटाचाही पाठिंबा, राजन साळवींनी मांडली भूमिका

कोकणातील रिफायनरीला आता ठाकरे गटाचाही पाठिंबा, राजन साळवींनी मांडली भूमिका

Subscribe

रत्नागिरी – सुमारे २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला तेल शुद्धिकरण प्रकल्प (Refinery Project in Rajapur) नाणारऐवजी आता बारसू (जि.रत्नागिरी) येथे होणार आहे. मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब झाले आहेत. कोकणातील रिफायनरीला शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाने आता समर्थन दिलं आहे. राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी (Shivsena Leader Rajan Salvi) यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा – तेल शुद्धीकरण प्रकल्प बारसूत होण्याचे निश्चित, उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली बैठक

- Advertisement -

नाणार आणि पंचक्रोशीतीली नागरिक तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या विरोधामुळे तेल शुद्धिकरण प्रकल्प रखडले होते. मात्र, राज्य सरकार हा प्रकल्प कोकणातच करण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तेल शुद्धिकरण प्रकल्पासाठी बारसूची जागा निश्चित ककेली असून प्रकल्पाला चालना देण्यास सुरुवात केली आहे. आता ठाकरे गटानेही या प्रकल्पाला समर्थन दिलं आहे. रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेने भूमिका बदलल्याने पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केलाय. यावरून, आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघातून मतदारांची संख्या कमी होतेय. येथील तरुण वर्ग नोकरीच्या निमित्ताने मुंबई-पुणे, कोल्हापुरात स्थलांतरित होत आहेत. हे स्थलांतर थांबवण्यासाठी रिफायनरी प्रकल्प राजापुरात होणं गरजेचं आहे, असं राजन साळवी म्हणाले आहेत. तसंच, रिफायनरीसारख्या महाकाय प्रकल्पामुळे कोकणातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे असंही राजन साळवी म्हणाले. त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण ट्विट करून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

राजन साळवी यांनी मांडलेली भूमिका जशीच्या तशी वाचा

आपण जाणताच आहात की माझ्या राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार कमालीच्या वेगाने घटली आहे व ती निरंतर कमी होत आहे. याचे प्रमुख कारण आहे युवक वर्गाचे नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ येथून शहराच्या दिशेने होणारे स्थलांतर.

कोकणातील प्रमुख फळपीक आंबा आहे. हे मोसमी फळपीक असून केवळ हंगामी रोजगार उपलब्ध करून देणारे आहे. विविध नैसर्गिक कारणांमुळे येथील मत्स्योत्पादनातही कमालीची घट दिसून येत आहे. परिणामस्वरूप राजापूर परिसरातील युवक हा कायमच नोकरीधंद्याच्या शोधार्थ मुंबई-पुणे कोल्हापूरच्या दिशेने निघून जात राहणार आहे. तरुण वर्ग इथून जवळपास दुर्मिळ होत असल्याने उरल्यासुरल्या शेतीविषयक कामाला देखील येथे पुरेसे सक्षम मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, अशा दुष्टचक्रात कोकण सापडले आहे.


रिफायनरीसारखा महाकाय प्रकल्प येथे आल्यास येथे लाखो तरुणांना रोजगार व अनेक कुटुंबांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील व राजापूर तालुक्यातील नोकऱ्यांचा अनुशेष भरून निघण्यास मदत होईल. या महाकाय प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातून कायमस्वरूपी होणारे स्थलांतर थांबेल अशी मला खात्री आहे.

राजापूर तालुक्यातील सुमारे सव्वाशे गावांनी तसेच जवळपास 75 बिगर राजकीय सामाजिक संस्थांनी या प्रकल्पाची मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्याला अनुसरून, आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी, त्यांना अत्यंत प्रिय असलेल्या कोकणी जनतेच्या हितासाठी रिफायनरीसारख्या प्रकल्पाला राजापूर तालुक्यात जमीन उपलब्ध करुन देण्याची अनुकूलता आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मी स्थानिक आमदार या नात्याने घेतली आहे.

काही समाज विघातक संस्थांनी प्रकल्पविरोधात धादांत खोटा जहरी अपप्रचार राबवल्याने माझ्या मतदारसंघातील काही भागात प्रकल्पाला विरोध देखील आढळतो. 13 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकल्पाबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात मी निमंत्रित म्हणून उपस्थिती नोंदवलेली आहे. स्थानिक ग्रामस्थांचे प्रकल्पाबाबत प्रबोधन करणे गरजेचे आहे. बैठकीस उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच स्थानिक लोकप्रतिनिधींनी व मी देखील ही बाब तेथे प्रशासनाच्या निदर्शनास आणली होती. मात्र स्थानिकांचे प्रबोधन करण्याचे कोणतेही पाऊल प्रशासनाने अद्याप उचललेले नाही.

एकूण राजापूर तालुक्यात प्रकल्पाबाबत सकारात्मक वातावरण आहे. प्रशासनाने प्रबोधनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवल्यास संपूर्ण जन समर्थन प्राप्त होईल याची मला खात्री आहे. त्याकरिता करावयास लागणाऱ्या प्रबोधनाची रुपरेषा मी या पत्राद्वारे आपणाकडे सुपूर्द करत आहे. प्रशासनाने स्थानिकांवर बळजबरी न करता लोकांच्या प्रबोधनाद्वारे हा प्रकल्प पुढे नेल्यास संघर्ष टाळता येईल. मात्र याबाबत एमआयडीसी अथवा स्थानिक प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नाही अथवा पावले उचलली जात नाहीत.

कोणत्याही महाकाय प्रकल्पाला परिसराच्या विकासाकरिता काही रक्कम खर्च करणे अनिवार्य आहे. त्यामुळे या महाकाय प्रकल्पाद्वारे देखील स्थानिक विकासाकरिता काही योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे. या प्रकल्पाचा सर्वंकष फायदा राजापूर व पर्यायाने कोकणी जनतेस व्हावा.

या पाच बाबींकडे वेधले लक्ष

१. कोकणात आज प्रचंड बेरोजगारी आहे व कोकणी युवक-युवती नोकरी, व्यवसायाच्या शोधार्थ कोकणातून बाहेर स्थलांतरित होत आहेत. या प्रकल्पाद्वारे सुमारे एक ते दीड लाख कुशल, अर्ध कुशल व अकुशल लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक युवक, युवतींना प्रशिक्षित केल्यास या स्वरुपाच्या लाखो नोकऱ्या या प्रकल्पात व अनुषंगिक उपक्रमात उपलब्ध होतील व स्थानिकांना फार मोठी नोकरी व्यवसायाची संधी उपलब्ध होईल.

स्थानिक आमदार या नात्याने या प्रकल्पात व अनुषंगिक उपक्रमात प्रामुख्याने एक ते दीड लाख स्थानिक युवक- युवतींना आवश्यक प्रशिक्षण देऊन नोकरी व्यवसायात प्राधान्यक्रमाने सामावून घेण्याची मागणी राजन साळवी करणार आहेत. तसेच परिसरातील महिला व प्रामुख्याने अंग मेहनत करणाऱ्या शेतमजुरांकरिता उत्पन्नाची योजना देखिल जाहीर करण्याची विनंती साळवी यांनी केली आहे.

२. या प्रकल्पाकरिता वार्षिक सुमारे 2 ते 2.5 टीएमसी इतक्या मोठ्या स्वरुपाच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत राजापूर तालुक्यात औद्योगिक प्रकल्पाकरिता एवढ्या मोठ्‌या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नाही. मात्र कोयना धरणातून वीज निर्मितीनंतर 67.5 टीएमसी इतके पाणी चिपळूण येथील कोळकेवाडी जलाशयात साठवून वीज निर्मितीनंतर वशिष्ठ नदीमार्गे अरबी समुद्रात सोडण्यात येते. समुद्रात वाया जाणाऱ्या पाण्याचा विनियोग या प्रकल्पाच्या औद्योगिक वापराकरिता करण्यात येऊ शकतो. याकरिता सुमारे 120 किलोमीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन आवश्यक आहे. या महाकाय प्रकल्पाची पाण्याची गरज भागविण्याकरिता सदर पाईपलाईनद्वारे अशा स्वरुपाचा पाणीपुरवठा प्रकल्पाला करणे संयुक्तिक राहील. सदर ऑइल कंपनीकडे मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनने तरल पदार्थांचे वहन करण्याची तंत्र कुशलता उपलब्ध आहे. चिपळूण ते राजापूर दरम्यान चिपळूण-रत्नागिरी-लांजा ओणी- पाचल-संगमेश्वर यासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या नगरपरिषद, नगरपालिका छोट्या नगरपंचायती व असंख्य गावे आहेत. अशा स्वरुपाची पाईपलाईन चिपळूण ते राजापूरच्या दरम्यान प्रस्तावित केल्यास, मार्गातील अनेक शहरे व गावांच्या पिण्याच्या तसेच औद्योगिक वापराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटू शकतो. त्याचा फार मोठा सकारात्मक परिणाम येथील भागातील अर्थव्यवस्थेवर जाणवेल. वशिष्ठी नदीतून वाया जाणारे हे अतिरिक्त पाणी पाईपलाईनद्वारे मोठ्या प्रमाणात दक्षिणेकडे वळविल्यास फार मोठ्या क्षेत्रात दुबार पीक योजनादेखील घेता येईल, असं राजन साळवी म्हणाले.

म्हणूनच चिपळूण ते राजापूर अशी पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित करून सदर महाकाय पाणी पुरवठा योजना आपण प्रकल्पाद्वारे या परिसरात राबवून घ्यावी व संबंधित गावे व नगरपालिका, नगरपंचायती यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील याच योजनेद्वारे करण्यात यावा, अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे.

३. राजापूर शहर व तेथून समुद्राच्या दिशेला असलेले अर्जुना व कोदवली नदीपात्र गाळाने पूर्ण भरले आहे. दरवर्षी पावसाळ्यात राजापूर बाजारपेठ पुराने वेढली जाऊन हाहाकार सदृश्य परिस्थिती निर्माण होते.

पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी या नदीपात्रातील सुमारे पाच किलोमीटर इतक्या लांबीच्या क्षेत्रातील गाळ उपसा होणे नितांत आवश्यक आहे. मात्र सदर योजनेला फार मोठ्या स्वरूपाची तंत्र कुशलता व आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. रिफायनरीसारख्या प्रकल्पाद्वारे अशी तंत्र कुशलता व आर्थिक पाठबळ उपलब्ध होऊ शकते. राजापूर नगरपरिषदेने देखिल सदर गाळ उपसा करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.

याला अनुसरून राजापूर शहरातील पूर परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाने अर्जुना व कोदवली नदीतील सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या क्षेत्रातील गाळ उपसा करून त्याचे पिचिंग नदीकिनारी न करता दुर डोंगर माथ्यावर करावे अशीही मागणी साळवी यांनी केली आहे.

४. राजापूर तालुका व आजूबाजूचा परिसर यामध्ये वैद्यकीय सुविधांची अत्यंत वानवा आहे. अगदी लहान सहान स्वरुपाच्या आजारपणाला देखील येथील नागरिकांना कोल्हापूर, मुंबई अथवा पुण्यासारख्या दूर अंतरावरील इस्पितळे गाठावी लागतात. महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या हालाला तर पारावर नाही. कित्येक अपघातग्रस्तांनी व हृदयरोगांनी इस्पितळ गाठण्यापूर्वीच आपले प्राण सोडले आहेत. परिसरात अद्यावत इस्पितळ असल्यास कोकणातील जनतेच्या वैद्यकीय समस्यांचे वेळेत निराकरण होणे शक्य होईल. याकरिता राजापूर परिसरात एक मोठे सुसज्ज इस्पितळ या प्रकल्पाद्वारे तातडीने उभारण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

५. मुंबई-गोवा रस्ता रुंदीकरणात लाखो वृक्षांची अपरिमित हानी झाली. मात्र ते करणे अपरिहार्य होते. निसर्गाचे झालेले हे नुकसान भरून काढण्याकरिता आपण एक फार मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवावा विनंती करण्यात आली आहे. या रस्ता रुंदीकरणादरम्यान कापल्या केलेल्या झाडांच्या बदल्यात संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावरील किमान रत्नागिरी जिल्ह्यात कमीत कमी एक लाख झाडे रस्त्याच्या दुतर्फा या प्रकल्पाद्वारे लावण्याची योजनेचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -