नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात  ६ जवान शहीद

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ६ जवान शहीद

छत्तीसगड
नक्षलवाद्यांची कंबर मोडण्याचा प्रयत्न सुरक्षा दल करत असताना रविवारी छत्तीसगडमधील दंतेवाडात नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यात सुरक्षा दलाचे सहा जवान शहीद झाले आहेत.

पाच जवानांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
नक्षलवाद्यांनी दंतेवाडा येथील छोलनार गावात भू-सुरुंग लावून जवानांची गाडी उडवली. यामध्ये पाच जवानांचा जागीच, तर एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी एक जवान जखमी आहे. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी जवानांचा शस्त्रसाठाही लुटला आहे. माहिती मिळताच सीआरपीएफने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. शहीद झालेल्या जवानांमध्ये छत्तीसगड सशस्त्र बलाच्या आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे.

अत्यंत तीव्र क्षमतेची स्फोटके
दंतेवाडातील छोलनार गावात शोधमोहीम सुरू असताना हा स्फोट झाला. अत्यंत तीव्र क्षमतेची स्फोटके वापरून हा स्फोट घडवण्यात आला. यात गाडीतील सातपैकी पाच जवान जागीच ठार झाले, तर दोन जवान जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. एकावर अजूनही उपचार सुरूच आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुंदर राज (नक्षलविरोधी मोहीम) यांनी दिली.

ही पहिलीच वेळ नाही
नक्षलवाद्यांनी भू-सुरुंग स्फोट घडवून आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा असे हल्ले करण्यात आले आहेत. याआधी १३ मार्च रोजी नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर अशाच पद्धतीने हल्ला केला होता. सुरुवातीला स्फोट घडवून आणण्यात आला आणि त्यानंतर जवानांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात ९ जवान शहीद झाले होते.

First Published on: May 21, 2018 10:43 AM
Exit mobile version