लखीमपूर हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू

लखीमपूर हिंसाचारात ९ जणांचा मृत्यू

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात ४ शेतकरी, ४ भाजप कार्यकर्त्यांसह अजून एका व्यक्ती अशा ९ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण तापले असताना विविध राजकीय पक्षांचे नेते लखीमपूर येथे जाण्यास निघाले, मात्र उत्तर प्रदेश प्रशासनाने त्यांना लखीमपूर येथे प्रवेश करू दिला नाही. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सध्या संपूर्ण देशात सुरू झाली असून हे प्रकरण गंभीर वळण घेणार असे दिसू लागले आहे.

३ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य त्यांच्या पूर्वनियोजित लखीमपूर खीरी दौर्‍यावर होते. तेथे ते काही सरकारी योजनांचे उद्घाटन करणार होते. त्यासाठी आधी ते हेलिकॉप्टरने येतील असे निश्चित केले. त्यानंतर अचानक सकाळी प्रोटोकॉल बदलत ते रस्ता मार्गे लखीमपूर पोहोचले. संयुक्त किसान मोर्चाने उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांच्या या दौर्‍याला विरोध केला होता. त्यांच्या दौर्‍याला विरोध करण्यासाठी लखीमपूर आणि उत्तर प्रदेशच्या तराई परिसरातील इतर जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मृतांच्या नातेवाईकांना ४५ लाख
लखीमपूर खीरी येथील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या चार शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ४५ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असून जखमींना १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच पीडितांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे.

First Published on: October 5, 2021 6:30 AM
Exit mobile version