‘त्या’ हल्ल्यात चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार

‘त्या’ हल्ल्यात चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार

पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यात १५ जूनच्या रात्री भारतीय सैनिकांवर चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय जवानांनी शौर्यता दाखवत चीनच्या कमांडिंग ऑफिसरला ठार मारले आहे. खुद्द चीननेच हे कबूल केले असून मागच्या आठवड्यात भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत चीनने स्वत: हे सांगितले आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चिनी सैन्य अधिकार्‍यांमध्ये चुशूलमधील मोल्डो येथे बैठक सुरू असताना ही माहिती समोर आली आहे.

मोल्डो हे ठिकाण चीनमध्ये आहे. १९६७ नंतर प्रथमच मागच्या आठवड्यात गलवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने चीनचा कमांडिंग ऑफिसर ठार झाल्याचे वृत्त दिले आहे. आठवड्याभरानंतर भारतीय आणि चिनी सैन्य अधिकार्‍यांमध्ये तणाव कमी करण्यासाठी बैठक सुरू असताना ही माहिती समोर आली आहे.

चीनने केलेल्या या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाले. गलवान नदीजवळ १५ हजार फूट उंचीवर हा संघर्ष झाला होता. तणाव वाढवायचा नसल्याने चीनने अजूनपर्यंत नेमकी जीवितहानी किती झाली? याबद्दल काहीही सांगितलेले नाही. या संघर्षात कर्नल संतोष बाबू सुद्धा शहीद झाले.

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा कुठलाही हल्ला परतवून लावण्यासाठी भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यात निपुण असलेली विशेष फोर्स तैनात केली आहे. चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या पश्चिम, मध्य आणि पूर्व सेक्टरच्या सीमारेषेवर ही विशेष माऊंटन फोर्स तैनात झाली आहे.

कुठल्याही परिस्थितीत नियंत्रण रेषा सुरक्षित ठेवण्याचे भारतीय लष्कराला निर्देश देण्यात आले आहेत. चीनने गलवान खोर्‍याजवळ मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव करून ठेवली आहे. चीनची युद्धवाहने देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मागच्या अनेक वर्षांत भारताने डोंगराळ भागातील युद्ध लढण्यासाठी विशेष तुकड्यांना प्रशिक्षित केले आहे.

First Published on: June 23, 2020 6:47 AM
Exit mobile version