अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन, अनुपम खेर यांनी दिली माहिती

अभिनेता, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन, अनुपम खेर यांनी दिली माहिती

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांचे पार्थिव दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात असून लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार होणार आहेत.

अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. ‘मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे!’ हे माहित आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहावे लागेल, हे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती’ असं भावपूर्ण ट्वीट अनुपम खेर यांनी केलं आहे.


तसंच, अभिनेत्री कंगना राणौतनेही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘सकाळी उठल्यावर ही धक्कादायक बातमी कळाली. सतीश हे खूप चांगले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. आम्हाला त्यांची आठवण येईल. ओम शांती.’ असं ट्वीट कंगनाने केलं आहे.


अभिनेता, विनोदी कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविध भूमिकांमधून सतीश कौशिक यांना सर्वांनीच पाहिलं आहे. १३ एप्रिल १९५६ मध्ये त्यांचा जन्म झाला. चित्रपटांत येण्याआधी ते नाटकांमध्ये काम करत असत. १९८७ मध्ये आलेला मिस्टर इंडिया चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

First Published on: March 9, 2023 7:47 AM
Exit mobile version