हिंडेनबर्गला अदानी कोर्टात खेचणार; अमेरिकेत वकिलांची फौज केली तयार

हिंडेनबर्गला अदानी कोर्टात खेचणार; अमेरिकेत वकिलांची फौज केली तयार

नवी दिल्लीः अफरातफरीचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग संस्थेला अमेरिकेतील कोर्टात खेचण्याची तयारी अदानी समुहाने सुरु केली आहे. या कायदेशीर लढाईसाठी अदानी समुहाने अमेरिकेत वकिलांची फौज तयार केली आहे. त्यामुळे अदानी समुहाची हिंडेनबर्ग विरोधात लवकरच कायदेशीर लढाई सुरु होईल.

अमेरिकेतील वॉचटेल या लिगल फर्मला अदानी समुहाने वकीलपत्र दिले आहे. लिप्टन, रोसेन व कॉट्ज या लिगल फर्मच्या ज्येष्ठ वकीलांनाही अदानी समुहाने कायदेशीर लढाईसाठी वकीलपत्र दिले आहे. वॉचटेल ही अमेरिकेतील प्रसिद्ध लिगल फर्म आहे. अनेक खटल्यांमध्ये या फर्मने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच अदानी समुहाने हिंडेनबर्ग विरोधातील कायदेशीर लढाईसाठी या फर्मची निवड केली असल्याचे बोलले जात आहे.

हिंडेनबर्गने केलेल्या आरोपाचे अदानी समुहाने खंडन केले आहे. मात्र हे आरोप खोटे असतील तर अमेरिकेतील न्यायालयात दावा दाखल करा, असे आवाहन हिंडेनबर्गने अदानी समुहाला दिले होते. हे आवाहन स्विकारत अदानी समुहाने वॉचटेल लिगल फर्मला वकीलपत्र देऊन कायदेशीर लढाई सुरु केल्याचे वृत्त आहे.

हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. मात्र हे आरोप अदानी समुहाने फेटाळून लावले आहेत. हिंडेनबर्गने रिसर्चवर योग्य संशोधन केलेले नाही. त्यांनी केवळ कॉपी-पेस्ट केले आहे. तसेच हिंडेनबर्गने योग्य संशोधन केले नाही किंवा योग्य संशोधन केले पण लोकांची दिशाभूल केली आहे, असा दावा अदानी समुहाने केला आहे.

असे असले तरी हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाने त्यांचा नियोजित २० हजार कोटी रुपये मुल्याचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण अदानी समुहाने दिले आहे. तसेच अदानी समुहाला नेमके किती कर्ज दिले याचा तपशील सर्व बॅंकांना देण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जारी केले आहेत.

भारतात या घडामोडी घडत असताना अदानी समुहाने हिंडनबर्ग विरोधात अमेरिकेत कायदेशीर लढाईची तयारी सुरु केली आहे.

First Published on: February 10, 2023 6:37 PM
Exit mobile version