व्याघ्र प्रकल्पाजवळील खाणीच्या लिलावाला आदित्य ठाकरेंचा विरोध

व्याघ्र प्रकल्पाजवळील खाणीच्या लिलावाला आदित्य ठाकरेंचा विरोध

आदित्य ठाकरे आणि प्रकाश जावडेकरांमध्ये रंगला कलगीतुरा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाणीचा लिलाव होणार आहे. या प्रस्तावित लिलावास राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना आदित्य ठाकरे यांनी पत्रच लिहिलं आहे.

लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने २१ लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत नावाचं पॅकेज जाहीर केलं होतं. शिवाय, अर्थव्यवस्थेला चालना मिळतील असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये कोळसा खाण उत्खननात खासगी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने एकूण ४१ खाणींच्या लिलावाला परवानगी दिली आहे. यामध्ये बंदर कोळसा खाणीचा समावेश आहे. ही खाण ताडोब-अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून ७ ते ९ किलोमीटर अंतरावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळच्या खाणीबाबत काही मुद्दे प्रकाश जावडेकरांच्या निदर्शनास आणले असून त्यांना तसं पत्र लिहत या खाणीच्या लिलावाला विरोध दर्शवला आहे.

 

यापूर्वी १९९९ आणि नंतर २०११ असं दोन वेळा या परिसराचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यानंतर हा लिलाव रद्द करण्यात आला होता. यामुळे ताडोबा आणि अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे आपल्याला माहित असताना आपण या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हा नाश थांबवला होता. त्यांनी त्या क्षेत्राचं सर्वेक्षण केलं होतं आणि खाण साइट योग्य नाही असं अहवालात सूचित केलं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या भागाचं पुन्हा संरक्षण करावं अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी केली.


हेही वाचा – आमची बांधिलकी सिल्व्हर ओक-मातोश्री अशा येरझारा घालत नाही; विखेंचा राऊतांना टोला


 

First Published on: June 23, 2020 12:26 PM
Exit mobile version