राहुल गांधींच्या विधानावरुन लोकसभेत घमासान, कामकाज उद्यापर्यंत तहकूब

राहुल गांधींच्या विधानावरुन लोकसभेत घमासान, कामकाज उद्यापर्यंत तहकूब

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज सुरू होताच राहुल गांधींनी परदेशात केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ होताना दिसून आला. या गदारोळामुळे कनिष्ठ सभागृहाचे कामकाज आता उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडून होत आहे.

लोकसभेतील गोंधळ वाढल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. पण विरोधी पक्षांनी राहुल गांधींविरोधात आपली रणनीती आधीच आखली होती. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, या मागणीवर भाजप दुसऱ्या दिवशीही ठाम राहिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक खासदारांनी राहुल गांधींनी सभागृहात येऊन माफी मागावी, असे म्हटले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही दिवसभर संसदेचे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. संसद दिवसभर तहकूब केल्यामुळे सरकारला संसद चालवायची नाही, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी आज सांगितले.

राहुल गांधींनी कोणाची माफी मागण्याची गरज नाही
नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला यांनी राहुल गांधींना समर्थन देताना म्हटले की, “मी आज एका भारतीय वृत्तपत्रात राहुल गांधींवर लिहिलेला लेख वाचला आहे. त्या लेखात असे म्हटले आहे की, राहुल गांधींनी कुठेही पंतप्रधानांवर हल्ला केलेला नाही. त्यांनी एवढेच सांगितले आहे की, देशात काही गोष्टी घडत आहेत, ज्या अलोकतांत्रिक आहेत.” यावर आपण विचार केला पाहिजे आणि एकत्र मिळून सोडवायला पाहिजे. राहुल गांधी बरोबर बोलले आहेत, ते काहीच चुकीचे बोलले नाहीत. राहुल गांधींनी कोणाचीही बदनामी केलेली नाही. मी जे वाचले आहे त्यामुळे मला नाही वाटत की, राहुल गांधींनी कोणाची माफी मागण्याची गरज आहे. लोकशाहीत असेच चालते, कधी कोणाला बोलू दिले जाते, तर कधी बोलू दिले जात नाही. आशा आहे की हे लवकरच बरे होईल. आपण सर्व आपले म्हणणे मांडू शकू. मला वाटत नाही की राहुल गांधी काही चुकीचे बोलले आहेत. ज्यासाठी सत्ताधारी पक्ष म्हणतोय की, राहुल गांधींनी माफी मागावी. सभागृह चालू द्या आणि चर्चेदरम्यान राहुल गांधींनी काय चुकीचे बोलले ते सांगा.

राहुल गांधींनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
राहुल गांधींनी सभागृहात माफी मागण्याच्या प्रश्नावरून लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते मणिकम टागोर म्हणाले की, राहुल गांधी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राहुल यांनी काहीही चुकीचे सांगितलेले नाही. सावरकरांचे लोक माफी मागतात…काँग्रेसचे लोक कधीच माफी मागत नाहीत. भारतात जनतेचा आवाज दाबला जात असल्याचे राहुल यांनी सत्य सांगितले आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी ते वारंवार करत आहेत.

राहुल गांधींनी परदेशात देशाचा अपमान केला नाही – सौगता रॉय
तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सौगता रॉय म्हणाले की, सभागृहात विरोधक एकत्र नसतात, तर प्रत्येक पक्षाची स्वतःची रणनीती असते. टीएमसी हा विरोधी पक्ष आहे आणि आमची भूमिका वेगळी आहे. जनतेच्या म्हणण्यानुसार आम्ही आमचे पाऊल उचलू. आज आम्ही एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात आंदोलन केले. मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींच्या समर्थन करण्यासाठी पक्षांना पाचारण केले आहे. मात्र विरोधकांची लढाई आम्ही एकटेच लढू, हे आमचे तत्त्व आहे. तसेच राहुल गांधींना माफी मागण्याची गरज नाही. त्यांनी देशाचा अपमान केला आहे, असे मला वाटत नाही, सत्ताधारी पक्षाचे विधान चुकीचे आहे.

परदेशात भारताचा अपमान झाला आहे
पियुष गोयल राज्यसभेत म्हणाले की, परदेशी भूमीवर राहुल गांधी यांनी भारताचा अपमान केली आहे. भारतीय राज्यघटना आणि न्यायव्यवस्थेचा अवमान झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. एका ज्येष्ठ खासदाराने भारताचा अपमान केला आहे. त्यामुळे मी सर्व पक्षांना याचा निषेध करण्याचे आवाहन करेन.

राहुल गांधी परदेशात का जातात यावर चर्चा झाली पाहिजे
भाजप खासदार रवी किशन यांनी राहुल गांधींच्या मुद्द्यावर म्हटले की, जेव्हा त्यांना बोलण्याची संधी दिली जाते तेव्हा ते व्यर्थ का बोलतात? बोलायला वेळ मिळाला तर त्यांनीही तयारी करावी. जेव्हा ते इथे भेटत नाहीत तेव्हा ते परदेशी मंचावर जाऊन गळा काढतात. खरे तर ते परदेशात का जातात यावर चर्चा झाली पाहिजे. त्यांना प्रत्येकी एक तास बोलण्यासाठी दिला जातो, मात्र ते बोलण्याऐवजी ओरडतात. यासाठी त्यांनी सभागृहाची आणि देशाची माफी मागितली पाहिजे.

First Published on: March 14, 2023 3:55 PM
Exit mobile version