ईडीकडून यंग इंडियाचे कार्यालय सील; आक्रमक काँग्रेसचं शुक्रवारी देशभरात आंदोलन

ईडीकडून यंग इंडियाचे कार्यालय सील; आक्रमक काँग्रेसचं शुक्रवारी देशभरात आंदोलन

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने यंग इंडिया लिमिटेडचं कार्यालय सील केले आहे. याशिवाय काँग्रेस मुख्यालय आणि काँग्रेस नेते राहुल गांधींच्या निवासस्थानी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईमुळे काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे. यंग इंडिया कार्यालयावरील कारवाईनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत जाहीर निषेध केला. यावेळी काँग्रेस नेते जयराम रमेश, अजय माकन आणि अभिषेक मून सिंघवी उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी केंद्रावर सूडाने राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

मंगळवारी ईडीने यंग इंडिया कार्यालयाची झडती घेतली, यानंतर आज कार्यालय सील करण्यात आले आहे. यंग इंडिया कंपनीचे 38 – 38 टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधींकडे आहेत. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेएलने आता यंग इंडियन कंपनी टेकओव्हर केली आहे.

दरम्यान सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या घराबाहेरील कडक सुरक्षा व्यवस्थेवरही काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांनी म्हटले की, पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेने सत्याचा आवाज दडपला जाणार नाही, महागाई, बेरोजगारी यावर प्रश्न विचारले जातील. यावर काँग्रेस नेते जयराम म्हणाले, दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालयासह राहुल आणि सोनिया गांधी यांच्या घराला वेढा घेतल्याने परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.

यावेळी बोलताना अजय माकन म्हणाले की, एआयसीसीकडून शनिवारी एक परिपत्रक जारी केले की, महागाई, बेरोजगारी विरोधात 5 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, काँग्रेस नेते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. डीसीपीकडून पत्र मिळाले की, काँग्रेस 5 तारखेला कोणतेही आंदोलन करू शकत नाही. मात्र महागाई, बेरोजगारी आणि खाद्यपदार्थांवरील जीएसटी विरोधात काँग्रेस आंदोलन करत राहील. आम्ही घाबरणार नाही. असं काँग्रेसकडून सांगण्यात आले आहेत.


राज्‍यात ओला दुष्‍काळ जाहीर करा; अजित पवार यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी


First Published on: August 3, 2022 8:32 PM
Exit mobile version