एअर इंडिया प्रकरणाच्या कारवाईला वेग, आरोपी प्रवाशाविरोधात ‘लूक आऊट’ नोटीस

एअर इंडिया प्रकरणाच्या कारवाईला वेग, आरोपी प्रवाशाविरोधात ‘लूक आऊट’ नोटीस

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात एका वृद्ध महिलेवर लघुशंका करणाऱ्या आरोपीविरोधात ब्युरो ऑफ इमिग्रेशनने लुक आउट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरून ही नोटीस जारी करण्यात आल्याने आरोपीला आता परदेशात पळून जाता येणार नाही.

एअर इंडियाच्या (Air India) विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने 70 वर्षीय महिलेवर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना गेल्यावर्षी 26 नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून संबंधित आरोपी मुंबईतील व्यावसायिक असल्याचे समोर आले आहे. शेखर मिश्रा असे आरोपीचे नाव असून तो मुंबईनजीकच्या मीरा रोड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. त्याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते, पण तो सापडला नाही. दिल्ली पोलिसांच्या पथकाने आरोपीची माहिती मिळवण्यासाठी त्याच्या नातेवाइकांची चौकशी सुरू आहे. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यास या प्रवाशाला 30 दिवसांची किंवा अंतर्गत समितीचा निर्णय होईपर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल
एअर इंडियाने केलेल्या तक्रारीच्या आधारे धक्कादायक प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध भादंवि कलम 354, 509 आणि भारतीय विमान वाहतूक कायद्याच्या कलम 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आतापर्यंत विमानातील केवळ चार कर्मचाऱ्यांची चौकशी झाली असून इतरांची आज चौकशी होणार आहे.

डीजीसीएची कडक भूमिका
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानेही (DGCA) या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात इंडिन एअरलाइन्सकडून अहवाल मागवण्यात आला आहे. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. तर दुसरीकडे, एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांकडून काही त्रुटी झाल्या का, हे शोधण्यासाठी अंतर्गत चौकशी देखील सुरू केली आहे.

महिला आयोगाकडून दखल
गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाचे विमान क्रमांक 102 जॉन एफ. केनेडी विमानतळावरून दिल्लीला येत असताना ही घटना घडली. या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करून यासंबंधीचा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश महिला आयोगाने काल, गुरुवारी एअर इंडियाच्या चेअरमनना दिले आहेत.

First Published on: January 6, 2023 11:33 AM
Exit mobile version