एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला लागली आग, माघारी नेत अबुधाबीला उतरविले

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला लागली आग, माघारी नेत अबुधाबीला उतरविले

अबुधाबी येथील विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. अबुधाबीहून कालिकत येथे जाणाऱ्या जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात मध्यभागी असलेल्या इंजिनला आग लागली. ही बाब लक्षात येताच पायलटने सुरक्षितपणे हे विमान पुन्हा अबुधाबी विमानतळावर उतरवले. या घटनेच्या वेळी विमानामध्ये 184 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या B737-800 VT-AYC ऑपरेटिंग फ्लाइट IX 348ने (अबू धाबी-कालिकत) अबुधाबी येथून उड्डाण घेतले. पण आकाशात 1000 फूट उंचीवर जाताच या विमानाच्या पायलटला इंजिन क्रमांक एकमध्ये स्पार्क झाल्याचे दिसले. त्यानंतर पायलटने कंट्रोल रूमशी संपर्क साधून विमान माघारी नेत अबुधाबी विमानतळावर सुरक्षितपणे उतरविले.

हेही वाचा – तालिबानी संघटनेकडून मुंबई उडवण्याची धमकी, एनआयएला ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

सदर घटना घडल्यानंतर डीजीसीएने या घटनेची माहिती घेतली. या विमानातून 184 प्रवासी प्रवास करत असल्याचे डीजीसीएद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यानंतर डीजीसीएने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उड्डाण करण्याआधी विमानाची तांत्रिक चाचणी करण्यात आली होती का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा – मराठा उमेदवारांना मोठा धक्का; सरकारी नोकरी भरतीत EWS आरक्षणाची संधी नाहीच

याआधी देखील म्हणजेच 23 जानेवारीला त्रिवेंद्रम येथून मस्कतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ते विमान 45 मिनिटांनी त्रिवेंद्रम विमानतळावर उतरविण्यात आले होते. एका मीडियाने दिलेल्या अहवालानुसार, त्यावेळी विमानाच्या फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान उतरविण्यात आले होते, अशी माहिती देण्यात आली होती. तर गेल्या वर्षी सुद्धा 22 डिसेंबर रोजी दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटमध्ये साप आढळला होता. त्यावेळी विमानाने कालिकत येथून उड्डाण केले होते आणि दुबईला पोहोचल्यानंतर विमानात साप आढळला होता.

First Published on: February 3, 2023 1:30 PM
Exit mobile version