पंजाब काँग्रेसमध्ये नवीन ट्विस्ट, अंबिका सोनी यांचा मुख्यमंत्री बनण्यास नकार

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते  कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले आहे. याचदरम्यान, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र सोनी यांनी मुख्यमंत्री पद स्विकारण्यास नकार दिला आहे. तब्येतीचे कारण देत सोनी यांनी नकार दिला आहे. यामुळे कॉंग्रेसमध्ये ट्विस्ट निर्माण झाले असून हायकमांड आता मुख्यमंत्री पदाची धुरा कोणाकडे सोपवणार याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सुनील जाखड, सुखजिंदरसिंग रंधावा यांच्या नावाचीही चर्चा आहे.

अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने पंजाबमध्ये राजकीय वातावरण ढवळले आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवीन मुख्यमंत्री निवडताना सावध पवित्रा घेतला आहे. गांधी कुटुंब आणि अंबिका सोनी यांचे जवळचे संबंध आहेत. सोनी यांनी संजय गांधी यांच्यासोबतही काम केले आहे. त्यांनी अनेकवेळा राज्यसभेचे सदस्यपद  सांभाळले आहे. यामुळे सोनिया गांधी यांची भिस्त अंबिका सोनी यांच्यावर आहे. मात्र त्यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली आहे. तब्येतीचे कारणाबरोबरच पंजाबमध्ये शीख व्यक्तीच मुख्यमंत्रीपदी हवा असे विधानही सोनी यांनी केले आहे.

येत्या चार महिन्यात पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. यामुळे नव्या मुख्यमंत्र्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. सध्या पंजाब कॉंग्रेसमध्ये अंतगर्त मतभेद सुरू असून त्याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपल्याला अपमानित झाल्यासारखे वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावरून कॉंग्रेसमध्ये अमरिंदर सिंग समर्थक आणि इतर असा वादही पेटला आहे.

 

First Published on: September 19, 2021 11:37 AM
Exit mobile version