मुंबई पाठोपाठ हैदराबादेतही अमित शाहांच्या सुरक्षाव्यवस्थेत ढिसाळपणा!

मुंबई पाठोपाठ हैदराबादेतही अमित शाहांच्या सुरक्षाव्यवस्थेत ढिसाळपणा!

मुंबई पाठोपाठ हैदराबादेतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ढिसाळपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. तेलंगणा मुक्ती दिनानिमित्त हैदराबादला पोहोचलेल्या अमित शाहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याची गाडी समोर आल्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांनी क्षणातच त्याची गाडी ताफ्याच्या समोरून हटवली.

गृहमंत्री काल शुक्रवारी रात्री उशिरा हैदराबादला पोहोचले होते. आज मुक्ती दिनानिमित्त अनेक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, टीआरएस नेते गोसुला श्रीनिवास यांनी त्यांची कार शाह यांच्या ताफ्यासमोर उभी केली. यामुळे सुरक्षा कर्मचारीही हैराण झाले. मात्र, सतर्क राहून त्यांनी तात्काळ गाडी तेथून हटवली.

गाडीला तोडफोड केल्याचा आरोप

टीआरएस नेते गोसुला श्रीनिवास म्हणाले की, मी तणावाखाली होतो. त्यामुळे गाडी अचानक तिथेच थांबली. परंतु त्यांनी माझ्या गाडीची तोडफोड केली. यासाठी मी पोलीस अधिकाऱ्यांशी या विषयावर बोलणार आहे.

मुंबईतही अमित शाहांच्या सुरक्षेत गलथानपणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती जाहीर करण्यासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ढिलाई झाल्याचे उघड झाले आहे. आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा पीए असल्याची बतावणी करत अमित शाह यांच्या आसपास एक तरुण फिरत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी शोध घेत त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याचे नाव हेमंत पवार असून तो धुळे जिल्ह्याचा आहे. 32 वर्षीय हेमंत पवारकडे गृह मंत्रालयाचे ओळखपत्र होते, असे सांगितले जाते. पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा ब्लेझर घातलेल्या हेमंत पवारकडे खासदारांच्या पीएकडे असणारा पासही होता. तसेच केंद्रीय गृह मंत्रालय असे लिहिलेल्या रिबिनला त्याने हा पास जोडला होता. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेरही फिरताना आढळला होता. तो अमित शाह यांची सुरक्षा तैनात असताना सुद्धा त्यांची सुरक्षा भेदून त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला, त्यामागे त्याचा हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.


हेही वाचा : अमित शाह यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील ढिलाई उघड, संशयित तरुणाला पोलिसांकडून अटक


 

First Published on: September 17, 2022 2:44 PM
Exit mobile version