अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, उद्या सादर होणार आर्थिक सर्वेक्षण

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, उद्या सादर होणार आर्थिक सर्वेक्षण

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने सोमवारी दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसद भवन संकुलात ही बैठक होणार आहे. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनापूर्वी अशा प्रकारची सर्वपक्षीय बैठक झाली आहे. 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षणाचा अहवालही सादर केला जाणार आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी 2023पासून सुरू होईल आणि ते 6 एप्रिल 2023पर्यंत चालणार आहे. या 66 दिवसांत सर्वसाधारण सुट्टीसह 27 बैठका होणार आहेत. अमृत ​​काळदरम्यान, राष्ट्रपतींचे अभिभाषण, केंद्रीय अर्थसंकल्प आणि इतर बाबींवरील आभार प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अधिवेशन काळात 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. जेणेकरून विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्या अनुदानाच्या मागण्यांची पडताळणी करू शकतील आणि त्यांच्या मंत्रालये वा विभागांशी संबंधित अहवाल तयार करू शकतील. त्यानंतर 12 मार्चपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

बुधवार, दि. 1 फेब्रुवारी 2023ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2023-24चा अर्थसंकल्प मांडतील. केंद्र सरकारकडून हा अर्थसंकल्प सादर करताना आगामी लोकसभा निवडणुकीवर विशेष लक्ष असणार आहे. पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या आधीचा हा अर्थसंकल्प असल्याने विविध सवलती जाहीर केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे संभाव्य मंदीचाही सरकारला सामना करावा लागणार आहे.

गेल्या महिन्यातील संसदेच्या हिवाळी अधिवेशन काळात चीनच्या तवांग येथील घुसखोरीचा मुद्दा गाजला होात. यावरून संसदेत गदारोळ झाला होता. तवांगच्या मुद्द्यावरून 17 विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला होता. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही याप्रकरणी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. यासोबतच गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देखील संसदेत गदारोळ झाला होता. परिणामी, संसदेचे हिवाळी अधिवेशन मुदतीपूर्वीच संपविण्यात आले होते.

हेही वाचा – राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज समारोप, 21 पक्षांना निमंत्रण

First Published on: January 30, 2023 9:53 AM
Exit mobile version