अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, TRP वाढवण्यासाठी माजी CEOला दिले लाखो रुपये

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ, TRP वाढवण्यासाठी माजी CEOला दिले लाखो रुपये

अर्णब गोस्वामी

काही दिवसांपूर्वी टीआरपी (TRP) घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बीएआरसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पार्थ दासगुप्ता यांना अटक केली होती. दरम्यान पार्थ दासगुप्ता यांच्या चौकशीतून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पार्थ दासगुप्ता यांच्या चौकशीमुळे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणी वाढणार आहे. अर्णब गोस्वामी यांनी टीआरपी वाढवण्यासाठी पार्थ दासगुप्ता यांना लाखो रुपयांचा लाच दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज किला कोर्टात हे सांगितले.

२४ डिसेंबरला पार्थ दासगुप्ता यांना अटक केली असून त्यांना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दासगुप्ता यांच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी कोठडीची मुदत वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता. यादरम्यानच टीआरपी घोटाळ्याप्रकरणी एक नवीन खुलासा झाला. अर्णब गोस्वामी यांनी टीआरपी वाढवण्यासाठी वेळोवेळी पार्थ दासगुप्ता यांना लाखो रुपये दिले आणि याचं लाखो रुपयातून पार्थ यांनी सोने, चांदीचे धातू, महागडी घड्याळे, महागडी रत्न खरेदी केली. तसेच त्यांनी आणखीही आर्थिक व्यवहार केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची अधिक चौकशी करण्यासाठी कोठडीत वाढ करावी, अशी मागणी पोलिसांनी केली.

न्यायालयाने आता पार्थ दासगुप्ता यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली असून त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप, आयपॅड पोलिसांनी जप्त केला. या जप्त केलेल्या वस्तूंमधून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Coastal Road: ‘सार्वजनिक हित पाहता काम थांबवता येणार नाही’- मुंबई सत्र न्यायालय


 

First Published on: December 29, 2020 12:32 PM
Exit mobile version