Asian Games : अस्तित्वात नसलेल्या नदीवर सिंचन प्रकल्प उभारण्याचा प्रकार… दानवेंची केंद्रावर टीका

Asian Games : अस्तित्वात नसलेल्या नदीवर सिंचन प्रकल्प उभारण्याचा प्रकार… दानवेंची केंद्रावर टीका

मुंबई : चीनमधील हांगझोऊ येथे नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. 28 सुवर्ण पदकांसह 107 पदके भारताने जिंकली. यापूर्वी 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 70 पदके जिंकली होती. यात महाराष्ट्रातील खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली. हाच संदर्भ देत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – …तर रेल्वेच्या दुर्घटना वारंवार का घडतायत? ठाकरे गटाचा थेट सवाल

यावेळी 100हून अधिक पदके जिंकण्याचा पण करून भारतीय खेळाडू हांगझोऊला रवाना झाले होते आणि हा पण त्यांनी खरा करून दाखवला. भारताने 100हून पदके जिंकल्यानंतर सर्वांनीच या खेळाडूंचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सर्व खेळाडूंचा गौरव केला. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनीही लष्कराचा भाग असलेल्या आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा गौरव केला. या खेळाडूंमध्ये सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे यांचाही समावेश होता.

या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 28 सुवर्णपदके जिंकली. कोणत्याही आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जिंकलेली ही सर्वाधिक सुवर्णपदकांची संख्या आहे. राज्यनिहाय पदकनिहाय खेळाडूंचा विचार करता हरियाणा आघाडीवर असून तेथील 44 खेळाडूंनी पदके जिंकली. तर, दुसऱ्या क्रमांकावर पंजाब (32) आणि महाराष्ट्र (31) तिसऱ्या क्रमांकावर आहे. खेलो इंडियाअंतर्गत केंद्राकडून देण्यात येणारा निधी आणि आशिया क्रीडा स्पर्धेतील राज्यांची कामगिरी यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

हेही वाचा – Israel-Hamas War : इस्रायलला पाठिंबा पण…, पॅलेस्टाइनबाबतही भारताने स्पष्ट केली भूमिका

देशाच्या खेलो इंडियाअंतर्गत गुजरातला 608 कोटींचा निधी उपलब्ध झालेला असताना या राज्यातील खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची संख्या ‘मोठ्ठा शून्य’ आहे. त्या उलट महाराष्ट्रासह अन्य राज्यांना तुटपुंजा निधी मिळूनही त्यांची कामगिरी दमदार राहिली आहे. अस्तित्वात नसलेल्या नदीवर महाकाय सिंचन प्रकल्प उभारण्याचा हा प्रकार आहे, अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील खेलो इंडियाचे जिम्नॅस्टिक्सचे केंद्र संभाजीनगरात आहे. मात्र येथील खेळाडू उत्तम कामगिरी करत असताना या योजनेच्या अंतर्गत येथे सुविधा आणि कोटी-दोन कोटींचा निधी देण्यात क्रीडा मंत्रालयाला आकस आहे. पक्षपातातून किमान खेळाडूंची तरी सुटका करावी केंद्र सरकारने, असे त्यांनी सुनावले आहे.

First Published on: October 13, 2023 11:47 AM
Exit mobile version