भाजपचे तीनही बालेकिल्ले उखडून टाकण्याकडे काँग्रेसची वाटचाल

भाजपचे तीनही बालेकिल्ले उखडून टाकण्याकडे काँग्रेसची वाटचाल

विधानसभा निवडणूक २०१८

आज सकाळपासून देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तेलंगणाचा अपवाद वगळता भाजप आणि काँग्रेस पक्षात चारही राज्यात चुरस पाहायला मिळत आहे. मात्र भाजपची सत्ता असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राज्यात काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यात भाजप मागच्या १५ वर्षांपासून सत्तेत आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसने १०८ जागांची आघाडी घेतली असून भाजप सध्या ७६ जागांवर आघाडीवर आहे. अजूनही अंतिम निकाल आलेले नाहीत. मात्र बहुमतासाठी लागणाऱ्या १०१ जागांचा आकडा काँग्रेसने पार केलेला आहे.

तर मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. भाजप १११ तर काँग्रेस १०९ जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. मध्य प्रदेशमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता आहे. तसे झाल्यास बसपा पक्षाचा चांगलाच भाव वधारू शकतो.

छत्तीसगढ राज्याच्या स्थापनेपासूनच भाजप तिथे सत्तेवर आहे. मात्र भाजपच्या या किल्ल्याला काँग्रेसने या निवडणुकीत सुरुंग लावला असून रमण सिंह यांना ही निवडणूक चांगलीच जड जाणार असे चित्र दिसत आहे. काँग्रेसने ५४ जागांवर आघाडी घेतली असून भाजप फक्त २४ जागांवर आहे. बहुमतासाठी ४६ जागांची गरज असताना काँग्रेसने हा आकडा पार केलेला आहे. आता प्रतिक्षा आहे अंतिम निकालाची. त्यानंतर कोणता पक्ष सत्तेवर येईल, हे निश्चित होऊ शकेल.

First Published on: December 11, 2018 10:13 AM
Exit mobile version