उत्तर काश्मीरमध्ये हिमस्खलन, ४ जवान बेपत्ता

उत्तर काश्मीरमध्ये हिमस्खलन, ४ जवान बेपत्ता

प्रातिनिधीक फोटो

उत्तर काश्मीरच्या अनेक भागांमध्ये मोठे हिमस्खलन झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या हिमस्खलनात ४ जवान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदीपोरा या जिल्ह्यांमध्ये हे हिमस्खलन झाल्याचे कळते. दरम्यान बेपत्ता जवानांच्या बचावकार्यासाठी लष्कारातर्फे हिमस्खलन बचाव पथक आणि लष्करी हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात येत आहे. मात्र या शोधमोहिमेबाबत लष्काराकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या गुरेज सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टर या ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. १८ हजार फूटांहून अधिक उंचीवर हिमस्खलनाची घटना घडली असून यामध्ये ४ जवान बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लष्कराकडून बेपत्ता झालेल्या जवानांचा शोध घेणे सुरु आहे.

१८ नोव्हेंबरच्या हिमस्खलनात ४ जवान शहीद

दरम्यान, जगातील सर्वात उंचीवर असलेली युद्धभूमी सियाचिन येथील ग्लेशियरमध्ये या वर्षी १८ नोव्हेंबर रोजी हिमस्खलनाची घटना घडली होती. या मध्ये भारतीय लष्कराचे ४ जवान शहीद झाले होते. या व्यतिरिक्त २ पोर्टर्सचा देखील मृत्यू झाला होता. तर तीन दिवसांपूर्वीच सियाचीनच्या दक्षिण भागात झालेल्या हिमस्खलनात लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते.

१००० हून अधिक जवान शहीद

सियाचीनमध्ये हिमस्खलनाच्या अनेक घटनांमध्ये शेकडो भारतीय जवान आतापर्यंत शहीद झाले आहेत. १९८४ पासून आतापर्यंत हिमस्खलानाच्या घटनांमध्ये लष्कराच्या ३५ अधिकाऱ्यांसह एक हजार पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत.

उणे ६० डीग्री तापमानात जवानांचे जीवन

सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण जगातील सर्वात उंच लष्करी क्षेत्रांपैकी एक आहे. हिवाळ्यात या ठिकाणचे तापमान उणे ६० डिग्री सेल्शियसपर्यंत पोहोचते. अशा कडाक्याच्या थंडीत जवानांचे शरीर थंडीने सुन्न होते.

First Published on: December 4, 2019 8:55 AM
Exit mobile version