Ayodhya Ram Mandir : राम नवमीसाठी अयोध्या सजली, भाविकांना होणार 20 तास दर्शन

Ayodhya Ram Mandir : राम नवमीसाठी अयोध्या सजली, भाविकांना होणार 20 तास दर्शन

राम नवमीसाठी अयोध्या सजली, भाविकांना होणार 20 तास दर्शन

अयोध्या : देशभरात राम नवमीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अयोध्येतील रामलल्लाचे मंदिर ही उत्सवासाठी सजले आहे. तर आनंदाची बाब म्हणजे राम नवमीच्या निमित्ताने अयोध्येतील राम मंदिर तब्बल 20 तासांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. राम नवमीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी, 17 एप्रिलला पहाटे साडेतीन वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांसाठी रामलल्लाचा दरबार खुला राहणार आहे. त्यामुळे आता तब्बल 15 लाख रामभक्त रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Ayodhya Ram Mandir temple open for 20 hours on occasion of Ram Navami)

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी (ता. 15 एप्रिल) पत्रकार परिषद घेत राम नवमीसाठी केलेल्या तयारीबाबतची माहिती दिली. त्यांनी याबाबत म्हटले की, रामलल्लाची शृंगार आरती पहाटे पाच वाजता होणार आहे. दर्शन आणि सर्व पूजा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. वेळोवेळी, रामलल्लाला नैवेद्य दाखविण्यासाठी थोडा वेळ पडदा काढला जाईल. तर तब्बल 20 तासांसाठी रामभक्तांना रामलल्लाचे दर्शन घेता येणार आहे. इतर दिवशी भाविकांना सकाळी 6:30 ते रात्री 9:30 पर्यंत दर्शन घेता येते. पण राम नवमीनिमित्त पाच तासांनी दर्शनाच्या वेळ वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा… Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 9 मे रोजी सेवा सहा तासांसाठी पूर्णपणे बंद; कारण काय?

व्हीआयपी पास चार दिवसांसाठी बंद…

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून भाविकांना रामनवमी, सुगम दर्शन पास, व्हीआयपी दर्शन पास, मंगला आरती पास, शृंगार आरती पास, शयन आरती पास देण्यात येतात. परंतु, राम नवमीनिमित्त चार दिवसांसाठी पासची सोय बंद करण्यात आली आहे. त्यामुळे 16 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत कोणालाही पास मिळणार नसल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. त्याशिवाय ऑनलाइण बुकिंगही बंद ठेवण्यात आली असून आधीपासून बनवलेले पासही रद्द केले जाणार आहेत.

तसेच, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, रामनवमीच्या दिवशी रात्री 11 नंतर मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी असेल तर दर्शनासाठी वेळ वाढवण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. दर्शनानंतर रामललाला नैवेद्य दाखवून शयन आरती होईल. शयन आरतीनंतर भाविकांना बाहेर पडण्याच्या मार्गावर प्रसाद मिळेल. भाविकांनी आपले मोबाईल, शूज, चप्पल, मोठ्या बॅग आणि प्रतिबंधित वस्तू जितक्या दूर ठेवतील त्यांना रामलल्लाचे दर्शन घेणे तितकेचे सोपे होईल.

अयोध्येत 100 ठिकाणी एलईडी स्क्रीन…

चंपत राय यांनी इतर माहिती देत सांगितले की, ट्रस्टने राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर, बिर्ला धर्मशाळेसमोर, सुग्रीव किल्ल्याच्या खाली भक्तांसाठी मदत शिबिरे उभारली आहेत. कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास तुम्ही तिथे जाऊन मदत मागू शकता. श्री रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. अयोध्या शहरात जवळपास 80 ते 100 ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. रामनवमी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण प्रसार भारती आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र द्वारे केले जाईल, अशी महत्त्वाची माहिती देखील मंदिराच्यावतीने देण्यात आली आहे.

हेही वाचा… Heat wave : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंचे राज्य सरकारला आवाहन

स्थानिकांनाही महत्त्वाच्या सूचना…

राम नवमीनिमित्त 15 लाखांपेक्षा अधिक भाविक अयोध्येत येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन मंदिराच्यावतीने करण्यात आले आहे. स्थानिकांनी रामनवमीच्या दिवशी घरी बसूनच मोबाईल किंवा टेलिव्हिजनवर रामलल्लाचे दर्शन घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे.


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 16, 2024 3:25 PM
Exit mobile version