राम मंदिर विश्वस्त समितीवरून संतांमध्ये नाराजी, अन्याय झाल्याचा आरोप

राम मंदिर विश्वस्त समितीवरून संतांमध्ये नाराजी, अन्याय झाल्याचा आरोप

अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या विश्वस्त समिती सदस्यांच्या निवडीवर अयोध्येतील संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘सरकारने आमची फसवणूक केली असून आमच्यावर अन्याय झाला आहे’, असा आरोप या संतांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी दिगंबर अखाड्याचे महंत सुरेश दास आज संताची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात येणार असून संतांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त समिती स्थापन करण्याची लोकसभेत घोषणा केली. या समितीमध्ये अनुसूचित जातीच्या सदस्यांसह १५ नवीन सदस्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही विश्वस्त समिती मंदिरांबाबतचे निर्णय स्वतंत्रपणे घेणार आहे. पण यावर अयोध्येतील संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘नवीन विश्वस्त समिती नेमण्याचा निर्णय म्हणजे संत महंतांचा अपमान आहे. सरकारच्या या भूमिकेवर देशभरातील संतांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून फोनवर अनेक संत याबद्दल विचारणा करत आहेत. यामुळे या बैठकीत आवश्यकता असल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जाईल’, असेही दास यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे प्रयागराज येथील संत सरकारने बनवलेल्या विश्वस्त समितीवर खुश आहेत. या समितीमध्ये ज्या व्यक्तींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याने संतांनी समाधान व्यक्त केले आहे. तर नृत्य गोपाल दास यांच्यासारख्या काही जणांचा समावेश या विश्वस्त समितीत न केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचा या समितीत समावेश करायला हवा होता, असेही म्हटले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे खजिल झालेले अयोध्येच्या तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ‘आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांना राम मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष करा’, अशी मागणी दास यांनी केली आहे. ‘राम मंदिर लढ्यात संघाचे महत्वाचे योगदान आहे. यामुळे संघप्रमुखांना विश्वस्त समितिचे अध्यक्षपद देण्यात यावे’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या विश्वस्त समितीत सर्वोच्च न्यायालयात राममंदिराची बाजू मांडणारे ज्येष्ठ अॅडव्होकेट केशवन अय्यंगार, जगतगुरु शंकराचार्य, जगतगुरु माधवानंद स्वामी, युगपुरुष परमानंद जी महाराज यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच पुण्यातील गोविंद देव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निरमोही अखाड्याचे धीरेंद्र दास यांचेही नाव आहे.

First Published on: February 6, 2020 4:16 PM
Exit mobile version