‘अयोध्या’ प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार!

‘अयोध्या’ प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार!

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक असा निकाल देत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पाडला. मात्र, आता पुन्हा हा वाद सर्वोच्च न्यायालयासमोर उभा ठाकणार आहे. ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर या निकालावर फेरविचार याचिका करणार नसल्याचं मुस्लीम पक्षाकडून सांगण्यात आलं होतं मात्र, आता या प्रकरणी फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचं अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने स्पष्ट केलं आहे. ‘अयोध्या प्रकरणात न्याय्य निकाल झाला नसून त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान देणार आहोत’, असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर रोजी अयोध्या प्रकरणाचा निकाल दिला होता. या निकालानुसार वादग्रस्त जागी राममंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, मुस्लीम पक्षकारांना अयोध्येमध्येच मोक्याच्या ठिकाणी मशीद उभारणी करण्यासाठी ५ एकर जमीन देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले. दरम्यान, यावेळी सुन्नी वक्फ बोर्डाचा वादग्रस्त जागेवरचा दावा न्यायालयाने अमान्य केला.

‘याचिका १०० टक्के फेटाळली जाणार’

दरम्यान, फेरविचार याचिका जरी न्यायालयात दाखल होणार असली, तरी ही याचिका १०० टक्के फेटाळली जाणार असल्याचं मुस्लीम पक्षकार मान्य करत आहेत. जमैत उलेमा ए हिंदचे मौलाना अर्शद मदानी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला आधीपासून माहिती आहे की आमची याचिका फेटाळली जाणार आहे. पण आम्हाला याचिका दाखल करावी लागणार. तो आमचा अधिकार आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

First Published on: November 17, 2019 4:47 PM
Exit mobile version