कलम ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न – बांग्लादेश

कलम ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न – बांग्लादेश

बांग्लादेशचे पंतप्रधान शेख हसिना

जम्मू आणि काश्मिरमधून कलम ३७० रद्द केल्याबद्दल भारतास आता बांग्लादेशचे समर्थन प्राप्त झाले आहे. याविषयी निवेदन देताना बांग्लादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. के. अब्दुल मोमेन म्हणाले की, ‘कलम ३७० रद्द करणे हा सर्वस्वी भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. तात्त्विकरित्या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राहावे.’ तसेच ‘विकास सर्व देशांसाठी प्राधान्याचा आणि महत्वाचा मुद्दा आहे’, असे मत बांग्लादेशने वेळोवेळी आंतरराष्ट्रीय समुदायापुढे ठेवले आहे. बांग्लादेशच्या या निवेदनामुळे पाकिस्तानला जबर धक्का बसला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी आज बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. बांग्लादेश दौऱ्यांच्या शेवटच्या दिवशी शेख हसीना आणि सुब्रमण्यम जयशंकर यांच्यात भेट झाली. काल जयशंकर यांनी बांग्लादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांची भेट घेतली होती.

कलम ३७० रद्द केल्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी

काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरुद्ध चांगलेच रान पेटवले होते. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत काश्मीर प्रश्न नाजूकपणे हाताळण्याचा सल्ला दिला. कलम ३७० च्या मुद्द्यावर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात सुद्धा धाव घेतली. पाकिस्तानने यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाला पत्र पाठवले होते. याशिवाय चीनने देखील कलम ३७० मुद्यावरुन संयुक्त राष्ट्र संघाला पत्र पाठवले. संयुक्त राष्ट्र संश्रघात यासंदर्भात बंद दरवाज्याआड चर्चा झाली. या चर्चेत पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र संघाने घरचा आहेर दिला. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली.

First Published on: August 21, 2019 3:10 PM
Exit mobile version