राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह आता बॅकफूटवर! म्हणाले, “अयोध्येत आले तर…”

राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह आता बॅकफूटवर! म्हणाले, “अयोध्येत आले तर…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या चेतावनीमुळे चांगलाच गाजला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी बृजभूषण शरण सिंह यांनी आंदोलनही पुकारलं होतं. राज ठाकरेंनी आधी माफी मागावी आणि मगच अयोध्येत यावे, अशी मागणी त्यावेळी बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द केला होता. यावर “राज ठाकरे दबंग नहीं, चूहा है, अपने बिल में रहता है”, असं खळबळजनक वक्तव्य हा भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी केलं होतं.

राज ठाकरेंना ‘चुहा’ म्हणणारे बृजभूषण सिंह आता बॅकफूटवर गेले आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे हेच बृजभूषण सिंह आता राज ठाकरे अयोध्यामद्ये आले तर मी त्यांचे स्वागत करेन, असं म्हणताना दिसून आले. त्यामुळे त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांसह महत्वाच्या नेत्यांसोबत अयोध्या दौऱ्यावर आहेत. यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार अयोध्येत दाखल झाले आहेत. यावेळी भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी हनुमान गढी इथे शिंदे-फडणवीस यांचं जोरदार स्वागत आणि सत्कार केला. बृजभूषण सिंग यांनी हजारो कार्यकर्ते आणि साधू-महंतांच्यावतीने शाल, श्रीफळ, भव्य गदा आणि कलश देऊन शिंदे-फडणवीस यांचं स्वागत केलं. त्यानंतर एका खाजगी वृत्तवाहिनीसोबत बोलताना बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले की, “राज ठाकरेंशी माझं काही वैयक्तिक भांडण नाही. त्यावेळी मी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर म्हटलं होतं की त्यांनी माफी मागावी आणि मग इकडे यावं. पण त्यांनी इथे न येऊन एक प्रकारे आमचा सन्मान केला आहे. त्यामुळे मोठा वाद टळला. आता मला वाटतं की ते जर आले तर मला कोणताही आक्षेप नाही. कुणालाच कोणता आक्षेप नाही.”

हे ही वाचा: अयोध्येत गेलेल्याच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर; सामनातून एकनाथ शिंदेंवर खरमरीत टीका

तेव्हा वाद टाळून त्यांनी उत्तर भारतीयांचा एक प्रकारे सन्मानच केला. ते जरी स्वत:च्या तोंडून खेद व्यक्त करू शकले नाहीत किंवा दिलगिरी व्यक्त करू शकले नाहीत तरी न येणं हा एक प्रकारे उत्तर भारतीयांचा सन्मानच आहे. आता मला राज ठाकरेंच्या बाबतीत काहीही म्हणायचं नाही. जशी अयोध्या आमची आहे, तशीच ती राज ठाकरेंचीही आहे. त्यांनी इकडे यावं, त्यांचं स्वागतच आहे”, असंही बृजभूषण सिंह यावेळी म्हणाले.

हे ही वाचा: अकोल्यात 100 वर्ष जुनं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 40 जखमी

बृजभूषण सिंह यांच्या या नव्या वक्तव्यानंतर आता राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू बृजभूषण सिंह अशाप्रकारे बॅकफूटवर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

First Published on: April 10, 2023 11:26 AM
Exit mobile version