घरमुंबईअयोध्येत गेलेल्याच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर; सामनातून एकनाथ शिंदेंवर खरमरीत टीका

अयोध्येत गेलेल्याच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर; सामनातून एकनाथ शिंदेंवर खरमरीत टीका

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रामध्ये गेल्या ७२ तासांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, मात्र सरकार अयोध्येत उत्सवात अडकून पडले आहे, हे काही रामराज्याचे चित्र नाही, अशी टीका शिवसेनेने (ठाकरे गट) केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री व उपमुख्यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटले की, ‘एकनाथ शिंदे काही आमदार, खासदारांसह रविवारी अयोध्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासोबत भाजपचे मंत्रीसुद्धा होते आणि पाठोपाठ उपमुख्यमंत्री फडणवीसदेखील त्याठिकाणी पोहचले होते. पण गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांना किंवा मंत्र्यांना अयोध्या किंवा प्रभू श्रीरामांची आठवण झाली नाही.’ अशी टीका भाजपावर करण्यात आली आहे. पुढे लिहिले आहे की, आम्ही अयोध्येत मागील पाचेक वर्षात हजारो शिवसैनिकांसह तीन-चार वेळा जाऊन आलो. आमच्या सोबत आजचे मिंधे सरकार आणि त्यांची टोळीसुद्धा होती.

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अयोध्या नगरीचे विशेष प्रेम. याशिवाय श्रीरामांच्या सुटकेसाठी व अस्मितेसाठी जो लढा झाला, त्यात शिवसेनाप्रमुखांचे मोठे योगदान होते. त्यामुळे शिवसेनेचे अयोध्येशी एक भावनिक नाते आहे. परंतु आता जे लोक अयोध्येत जाऊन नकली शिवसेनेचा जयजयकार करत आहेत त्यांच्यामध्ये ढोंग व खोक्यांतून निर्माण झालेला अहंकार आहे. मात्र भविष्यात कळेल की, अयोध्येतील रामदरबारी पाप आणि अहंकारास थारा नाही. पण जे मनाने श्रीरामांचे नाहीत ते बिनकामाचे अयोध्येत जाऊन काय कारणार? असा प्रश्नही अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

श्रीरामांच्या दरबारात सत्य व इमान यांचाच बोलबाला असतो, पण रामनाम भ्रष्ट करून स्वत:ची राजकीय भाकरी शेकण्याचा जो प्रयत्न सध्या महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे, ते रामनामास लांच्छन आहे. सरकारमधील काही मंत्री व आमदार अयोध्येत गेले असले तरी बरेच आमदार अयोध्या यात्रेत सहभागी झाले नाहीत, ते महाराष्ट्रातच राहिले. त्यांना प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला का जाऊ नये असे का वाटले, हे रहस्य आहे. पण शिंदे गटात दोन गट पडले आहेत आणि याची ठिणगी अयोध्येच्या भूमीवर पडली आहे. त्यामुळे अयोध्येत रविवारी साजरा झालेला उत्सव आहे की राजकीय निरोप समारंभ हे येणारा काळ ठरवेल, असा टोलाही शिवसेनेने लगावला.

- Advertisement -

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण सरकार अयोध्येत उत्सवात अडकून पडले आहे, हे काही रामराज्याचे चित्र नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बळीराजावर अवकाळीचा कहर झाला आहे आणि पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीवर उपाय शोधायचा सोडून सरकार महाराष्ट्रातून गायब झाले व अयोध्येत यात्रा-उत्सवांत अडकून पडले आहे. अयोध्येत जाऊन जे रामनामाचा जप करत आहेत, त्यांच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर आहे. त्यामुळे श्रीरामांच्या दर्शनाने त्यांचे पाप धुतले जाणार नाहीत. पण तरीसुद्धा त्यांना सुबुद्धी मिळो व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर होणारे रावणी हल्ले परतवून लावण्याचे त्यांना बळ मिळो, अशा शब्दात शिंदे सरकारच्या अयोध्या दौऱ्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -