काळ्या मातीत राबणारा सोलापुरी शेक्सपिअर !

काळ्या मातीत राबणारा  सोलापुरी शेक्सपिअर !

Farmer

बर्‍याचदा बळीराजा आपल्या समस्या समाजासमोर मांडण्यासाठी रस्त्यावर उतरून आपल्या समस्या मांडतो. संताप अनावर झाल्यावर तो आपले दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकून आपला रोष व्यक्त करतो. मात्र अक्षरशत्रू असलेल्या शेतकरी आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या बांधावरच्या एका बळीराजाच्या मुलाने प्राध्यापकी सोडून शेतात राबत -राबत इंग्रजीतून कादंबरी लिहिली आहे. ‘किंग्डम इन ड्रीम. दी प्राइम मिनिस्टर’ असं या कादंबरीचे नाव आहे.

शेतकर्‍यांच्या दु:खांचे प्रतिबिंब त्याच्या ‘किंग्डम इन ड्रीम… दी प्राइम मिनिस्टर’ या कादंबरीतून उमटले आहे. शेतकर्‍यांना होणारा त्रास त्यातून ही व्यवस्था बदलण्यासाठी शेतकर्‍याच्या तरुण मुलाच्या डोक्यात कोणते विचार येतात यावर हा शेतकरी युवक इंग्रजीतून भाष्य करतो हे विशेष. असं असलं तरी ही कादंबरी लिहिल्यानंतर मोरेंना स्वतःच्या देशाचे नाव आणि त्यातील पात्रांची नावे बदलून परदेशी नावे टाकावी लागली.. कारण प्रकाशक ते प्रकाशित करायला तयार नव्हते.

इंग्रजीतून लेखन करताना त्यांना आपल्या शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीही जाणवल्या. जागतिकस्तरावर जायचे असेल तर इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पहिलीपासून अभ्यासक्रमात इंग्रजी असावे असे मोरे यांना वाटते. पांडुरंग यांच्या आई सीताबाई आणि वडिलांनी कधीच शाळेची पायरी चढली नाही. लोकांच्या शेतात शेतमजुरी करीत उभी हयात घालवली. मात्र, मुलाने शिकले पाहिजे यासाठी आईचा मोठा हट्ट होता. बर्‍याचदा गावातील लोकांनी त्यांची चेष्टाही केली. मात्र त्यांनी मुलाच्या शिक्षणाबाबत तडजोड केली नाही.

आपली नाळ मातीशी जोडलेली राखत त्याचे लिखाण सुरुच आहे. सध्या त्याची इंग्रजीतून ‘व्हाइटमनी’ ही कादंबरी, तसेच ‘दि बर्थ डे गिफ्ट’, ‘हजबंड टेक्स्ट हजबंड ’ व ‘द डार्क अवे’ ही इंग्रजी नाटके, तर ‘लिडरशिप ऑफ सॉ’ व ‘आय आस्क फ्रिडम’ हे कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पांडुरंगच्या या कामगिरीनंतर गावातील लोकांना मात्र त्याचा अभिमान वाटत असल्याचे ग्रामस्थ प्रसाद पाटील यांनी सांगितले.

हल्लीच्या गळेकापू स्पर्धेत लोक नोकरीसाठी धडपडत आहेत. मात्र पांडुरंग मोरे यांनी शिक्षकी पेशा सोडून लिखाणाला वाहून घेतल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत . बळीराजाच्या समस्यांचे दर्शन उभ्या जगाला करुन देण्यासाठी पांडुरंग यांनी इंग्रजी कांदबरी लेखनाने केलेली नांगरणी भविष्यातील क्रांतीची बीजे उत्पादित केल्याशिवाय राहणार नाही हेच खरे.
पांडुरंग आजही शेतात राबतोय

पांडुरंग तानाजी मोरे हा पानगावचा (ता. बार्शी ) राहणारा एक जिद्दी तरुण. त्याची ही कादंबरी ‘पॅट्रीएज इंडिया’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे. छापील व ई-बुक स्वरुपातील ही कादंबरी ऑनलाइनही उपलब्ध आहे. आपली पहिली-वहिली कादंबरी पांडुरंगने माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना समर्पित केली आहे. अठरा विश्वे दारिद्य्रात वाढलेल्या पांडुरंग याने बी.एड. पूर्ण केले. सहायक प्राध्यापक म्हणून नोकरीही मिळाली. पण लिखाणाला वेळ मिळेना म्हणून नोकरी सोडून दिली आणि पत्र्याच्या शेडमध्ये गावातच शेतातील कामे करत करत लिखाण सुरू केले. पहिली कादंबरी प्रकाशित करण्यासाठी पांडुरंगला खूप परिश्रम घ्यावे लागले. मात्र आजही तो शेतात राबतो.
जिद्दीने लिखाणाची प्रेरणा मिळत गेली

शेतातील कुळवणी, पेरणी, खुरपणी, आंतरमशागत, कापणी, काढणी, मळणी याबरोबरच जनावरांचा व्याप हाताळत पांडुरंग लिहीत राहिला. पण शेतमजूर म्हणून कामं करुन फाटक्या प्रपंचाला ठिगळं लावायचा प्रयत्न करणा-या आई-वडिलांच्या दृष्टीने, ‘नोकरी सोडून दिली.अन् कागदं काळी करत बसतोय नुस्ती’ असे बोल त्याला ऐकावे लागले. जिद्दीने त्याला लिखाणाची प्रेरणा मिळत गेली आणि ‘किंगडम इन ड्रीम’ पूर्ण झाली.

सूर्यकांत आसबे । सोलापूर

First Published on: October 13, 2018 1:59 AM
Exit mobile version