Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी; मेंदूत झाला रक्तस्त्राव

Sadhguru Jaggi Vasudev : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर ब्रेन सर्जरी; मेंदूत झाला रक्तस्त्राव

नवी दिल्ली : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जग्गी वासुदेव यांच्या मेंदूला सूज तसेच रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांना तातडीने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांना अनेक दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता.

हेही वाचा – Ajit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी…; अजितदादांचे मिश्किल भाष्य

मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्च रोजी जग्गी वासुदेव यांना डोकेदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे डॉ. विनीत सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली जग्गी वासुदेव यांच्यावर उपचार केले जात आहेत. जग्गी वासुदेव यांचा  त्रास पाहून डॉक्टरांनी त्यांना एमआरआय करण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांच्या मेंदूला मोठी सूज आल्याचे तपासात समोर आले. तसेच त्यांच्या मेंदूत रक्तस्रावही होत असल्याचे एमआयआयमध्ये दिसून आले. अशा स्थितीत डॉक्टरांना त्यांच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली.

दिल्लीच्या अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी जग्गी वासुदेव यांच्यावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉ. विनीत सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस चटर्जी यांच्या अपोलोच्या टीमने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर जग्गी वासुदेव यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट विनीत सुरी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी म्हटले की, “जग्गी वासुदेव यांना 4 आठवड्यांपासून डोकेदुखीची तक्रार होती. खूप वेदना होत असतानाही ते आपले काम करत होते आणि सभा घेत होते. परंतु 17 मार्च रोजी अधिक त्रास जाणवू लागला. त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र आता शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती चांगली होत आहे. त्यामुळे त्यांना आता व्हेंटिलेटर सपोर्टची गरज नाही, असे म्हटले आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : माझी काही इमेज ठेवा; संजय राऊतांबाबतच्या प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल भाष्य

First Published on: March 20, 2024 7:10 PM
Exit mobile version