कॅबिनेटकडून इस्त्रोला १०,९०० कोटींचे आर्थिक पाठबळ

कॅबिनेटकडून इस्त्रोला १०,९०० कोटींचे आर्थिक पाठबळ

अंतराळ संशोसंधान भारताने प्रगती करावी यासाठी सरकारने आता आणखी एक पाऊल उचलले आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने इस्त्रोला अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला मोठे आर्थिक पाठबळ देऊ केले आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या पुढील ४ वर्षांसाठी केंद्रीय कॅबिनेटने तब्बल १०,९०० कोटींची मंजुरी दिली आहे. यामध्ये ३० पीएसएलव्ही, १० जीएसएलव्ही एमके III यांच्या प्रक्षेपणाच्या खर्चाचा समावेश आहे. केंद्राने दिलेल्या आर्थिक पाठबळाबद्दल इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

इस्त्रोमध्ये आनंदी आनंद!

केंद्राने दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. अध्यक्ष के. सिवन यांनी तशा भावना देखील बोलून दाखवल्या आहेत. यामध्ये, ४३३८ कोटी रूपये जीएसएलव्ही एमके IIIच्या १० प्रक्षेपणांसाठी तर, ६५७३ कोटी रूपये हे पीएसएलव्हीच्या ३० प्रक्षेपणांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत. यापुढील काळात ४ टनापेक्षा जास्त वजनाचे उपक्रम वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या रॉकेटची निर्मिती इस्त्रो करणार आहे. “अंतराळ कार्यक्रमात होणाऱ्या सुधारणा या सामान्य माणसासाठी नक्कीच फायद्याच्या ठरणाऱ्या असतील” असा विश्वास देखील यावेळी अध्यक्ष के. सिवन यांनी व्यक्त केला आहे. अंतराळ संशोधनात भारताने एक पाऊल पुढे असावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमी पुढाकार घेतल्याचे देखील अध्यक्षांनी सांगितले.

“इस्त्रोने आत्तापर्यंत केलेल्या कामागिरीचा आम्हाला अभिमान आहे. शिवाय आम्ही अंतराळ संशोधनात मोठे पाऊल उचलत असून आता, आम्हाला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही” असा विश्वास पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बोलून दाखवला. जीएसएलव्ही एमके III हा कार्यक्रम मागील तीन-चार वर्षात विकसित झालेला प्रोजेक्ट आहे. मेक-इन-इंडिया अंतर्गत त्याची निर्मिती करण्यात आलेली असल्याची माहिती देखील जितेंद्र सिंह यांनी दिली.

इस्त्रोचे मिशन चंद्रयान – 2

“इतर अंतराळ कार्यक्रमांप्रमाणेच भारतासाठी ऑक्टोबर -नोव्हेंबर – २०१८मध्ये चंद्रयान – २ हे मिशन देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याचे यश हे भारताच्या शिरात मानाचा तुरा रोवणारे असेल” असे देखील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले. केंद्राने इस्त्रोला दिलेले आर्थिक पाठबळ हे नक्कीच अंतराळ संशोधन कार्यक्रमात देशाला एक पाऊल पुढे ठेवणारे असेल!

First Published on: June 7, 2018 3:42 AM
Exit mobile version