पंतप्रधान ७ सप्टेंबरला राहणार इस्त्रोत उपस्थित; चांद्रयान २ चंद्रावर लँडींग करणार

पंतप्रधान ७ सप्टेंबरला राहणार इस्त्रोत उपस्थित; चांद्रयान २ चंद्रावर लँडींग करणार

'चांद्रयान-२'

इस्रोचे चांद्रयान-२ ने आज महत्त्वाचा टप्पा पार करत चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. या मोहिमेतील दोन महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लँडर विक्रम वेगळा होईल. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी विक्रम हा चंद्राच्या पृष्टभागावर लँड करणार आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील यावेळी इस्त्रोमध्ये उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

काय म्हणाले के. सिवान

या मोहिमेतील पुढील महत्त्वाचा टप्पा २ सप्टेंबर रोजी येईल. त्यादिवशी लँडर विक्रम हा ऑर्बिटरपासून वेगळा होईल. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी आम्ही काही सेकंदांसाठी इंजिनाची चाचणी घेऊन लँडरमधील प्रणाली व्यवस्थित चालू आहे की नाही याची चाचपणी करणात आहोत. ७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी लँडर विक्रम हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्टभागावर उतरेल, अशी माहिती त्यांनी दिली.

पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर हे ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे. चांद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी ४ दिवसाआधी रोव्हर ‘विक्रम’ उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर ६ ते ७ सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे ४ तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. तर १५ मिनिटांच्या आतमध्ये इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.

First Published on: August 20, 2019 2:44 PM
Exit mobile version