छत्तीसगड विधानसभा निवडणूक : काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस

छत्तीसगड विधानसभा निवडणूक : काँग्रेसकडून आश्वासनांचा पाऊस

काँग्रेस खासदार राहुल गांधी

छत्तीसगडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस जोरदार प्रचार करताना दिसत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी छत्तीसगडमध्ये आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास तरूणांना नोकरी, सर्वांना सरकारी रूग्णालयामध्ये मोफत उपचार आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिन, पाणी, कोळसा आहे. पण साऱ्या गोष्टींचा वापर करत १५ वर्षामध्ये भाजप सरकारनं केवळ उद्योगपतींना फायदा करून दिला. भाजपच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांशी राज्याची लुट केली. विकासापासून जनतेला दूर ठेवले असा घणाघात यावेळी राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर केला.

आणखी काय म्हणाले राहुल गांधी

काँग्रेस सत्तेमध्ये आल्यानंतर केवळ १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. शिवाय शेतीवर आधारित उद्योगधंद्यांची देखील निर्मिती केली जाईल. जेणेकरून तरूणांच्या हाताला काम मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना केवळ देशातील १० ते १५ उद्योगपतींची काळजी आहे. केवळ त्यांच्या फायद्याचा मोदी विचार करतात अशा शब्दात राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

यावेळी राफेल करारावरुन देखील राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं, पंतप्रधानांनी अनिल अंबानींना ३० हजार कोटींचा फायदा करून दिला. हा पेैसा आला कुठून? तर नोटाबंदीच्या काळात जनतेनं रांगेत उभे राहत आपल्या आयुष्याची कमाई बँकेत जमा केली. हा सारा पैसा लोकांचा आहे. अशा शब्दात राहुल गांधी यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले.

२००० ते २००३ या काळात काँग्रेसची छत्तीसगडमध्ये सत्ता होती. पण, आता मात्र मागील १५ वर्षापासून भाजपनं छत्तीसगडमध्ये सत्ता राखण्यास यश मिळवलं आहे. दरम्यान, यावेळी छत्तीसगडची जनता कुणाला साथ देते हे पाहावं लागणार आहे. मोदींनी देखील नक्षलवादाच्या मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं होतं.

वाचा – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ६ बॉम्बस्फोट

दोन टप्प्यांमध्ये निवडणूक

छत्तीसगडमधील ९० जागांसाठी छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान १८ जागांसाठी सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी मतदान झालं. तर, दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे २० नोव्हेंबर रोजी होणार असून ११ डिसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे छत्तीसगडची जनता कुणाला साथ देते यासाठी आता ११ डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

वाचा – छत्तीसगडमध्ये १०० वर्षाच्या आजीचं मतदान

First Published on: November 13, 2018 4:21 PM
Exit mobile version