मिम्स बनवतात म्हणून चीनी सरकारने चित्रपटच केला बॅन

मिम्स बनवतात म्हणून चीनी सरकारने चित्रपटच केला बॅन

सोशल मीडियावरील एक मिम

‘ते’ कार्टून चीनच्या पंतप्रधानांसाठी ठरतेय डोकेदुखी

आपल्यापैकी बहुतेकांना कार्टुन्स आवडतात. अनेकांचे बालपण कार्टून पाहण्यात गेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नव्वदीच्या दशकातील मुलांचे आवडते कार्टून म्हणजे ‘विनी द पूह’. आजही या कार्टूनचे व्हिडिओ लोक युट्यूबवर पाहतात. या कार्टूनचे किचन्स अनेकांच्या बॅगेच्या चैनीला लटकलेले पहायला मिळतात. विनीचे किचन, स्टिकर्स, कंपासपेटी, दप्तरापासून ते वॉटर बॉटलपर्यंत अनेक वस्तू मुलांकडे पहायला मिळायच्या. आजही अनेक कॉलेज तरुणींकडे विनीचे फोटो असलेल्या वस्तू पहायला मिळतात. याच सर्वांच्या लाडक्या विनीवर डिझ्नेने एक चित्रपट तयार केला आहे. ‘ख्रिस्तोफर रॉबीन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. जगभरातून या चित्रपटाला लोकांची आणि त्यातही प्रामुख्याने लहानग्यांची पसंती मिळत आहे. नव्वदीच्या दशकात जन्मलेली मुले आता मोठी झाली आहेत. या मुलांकडूनही ‘ख्रिस्तोफर रॉबीन’ला पसंती मिळत आहे. एकीकडे हा चित्रपट लोकांची पसंती मिळवत असताना या चित्रपटाला चीनी सरकारने बॅन केले आहे. विनी हे कार्टून चिनी सरकारची डोकोदुखी ठरत असल्याने त्यांनी हा चित्रपट बॅन केला आहे.

सोशल मीडियावरील एक मिम

हे आहे मजेशीर कारण

मागील वर्षभरापासून चीनचे पंतप्रधान शी जिंनपिंग सोशल मीडियावर अधून मधून ट्रोल होत आहेत. त्यांना ट्रोल करण्यासाठी नेटीझन्सनी विनीची मदत घेतली. अनेक जण शी जिंनपिंगची विनीसोबत तुलना करत असतात. विनी आणि जिंनपिंग यांचे फोटो एकत्र कोलाज करुन सोशल मीडियावर व्हायरल केले जातात. त्यांच्यावर अनेक मजेशीर मिम्स तयार केले जातात. त्या दोघांचे फोटो कोलाज करुन विविध प्रकारचे जीआयएफ तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंतीस पडतात. २०१७ मध्ये चिनी सरकारने सोशल मीडियावरुन हे मिम्स हटवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे आता ‘विनी’चा चित्रपट येतोय म्हटल्यावर चीनी सरकारचे धाबे दणाणले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोशल मीडियावरील एक मिम

सरकारची काय आहे प्रतिक्रिया?

चीनमध्ये विविध देशांमधील चित्रपट प्रदर्शित करण्यास चिनी सरकार प्राधान्य देत आहे. हॉलीवूडप्रमाणे इतर देशांमधील चित्रपटांनादेखील संधी मिळायला हवी. म्हणून हा चित्रपट बॅन केला असावा, असाही एक मतप्रवाह आहे.

First Published on: August 8, 2018 6:38 PM
Exit mobile version