चीनची घुसखोरी, अरुणाचलनंतर हिमाचलच्या सीमेवर रस्ते पूल, हेलिपॅड उभारणीला वेग

अरुणाचल प्रदेशमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ १०० घरांचे गाव वसवल्यानंतर चीनने आता हिमाचलच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागांवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. हिमाचलच्या एलएसीला लागून असलेल्या किन्नौर आणि लाहौल स्पीति जिल्ह्यात रस्ते, पूल आणि हेलिपॅड उभारणीचे काम वेगाने सुरू असून चीनने या भागात सैनिकांच्या चौक्याही उभारल्या आहेत.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांना राज्य पोलिसांनी दिलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार किन्नौर आणि लाहौल स्पीति या जिल्ह्यातील एलएसीवर चीनकडून सैनिकी चौक्या,रस्ते, पूलाबरोबरच हेलिपॅडचे काम सुरू आहे.

चीनने चुरुप येथे परेचु नदीच्या उत्तर किनाऱ्याला लागून रस्ते बांधणीचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर चीन शात्कोट, चुरुप आणि डनमुरू गावातही बांधकाम सुरू आहे. चुरुप गावात नवीन इमारतींबरोबरच अत्याधुनिक तंत्राने सज्ज अशा सैनिक चौकीचेही निर्माण केले आहे. १९६२ च्या यु्द्धादरम्यानही या भागात शांतता होती. पण गेल्या काही वर्षांपासून या भागात चीनी सैनिकांच्या हालचाली वाढल्या आहेत. भारताच्या या हवाई हद्दीमध्ये चीनी हैलिकॉप्टरची घुसखोरीही वाढली आहे. सप्टेंबर महिन्यात किन्नौरमध्ये गुंगरंग येथे चीनी सैनिकांबरोबर जवानांचा सामना झाला होता. त्यावेळी दोन्ही सैन्याने वापस जाओचा नारा दिला होता. पण त्यानंतर या भागात चीनी सैनिकांचे येणे जाणे वाढल्याचे राज्य पोलिसांनी सांगितले आहे.

First Published on: November 12, 2021 6:14 PM
Exit mobile version