ईशान्य भारताचे लोण आता दिल्लीतही पसरले

ईशान्य भारताचे लोण आता दिल्लीतही पसरले

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दक्षिण दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाला हिंसक रूप प्राप्त झाले. आंदोलनकर्त्यांनी दक्षिण दिल्लीच्या के. न्यू फ्रेंड्स कॉलनीत जाळपोळ केली. तीन बसेस आणि काही मोटरसायकलला आगी लावल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मात्र आदोलनकर्त्यांनी त्या गाड्यांनाही आग लावली. या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे दक्षिण दिल्लीच्या चार मेट्रो स्टेशनवर जाणार्‍या रस्त्यांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून ईशान्य भारतात सुरू असलेले आंदोलन दिल्लीत धडकले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकांनी जामियानगर ते ओखला असा मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनाच मारहाण करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. तसेच आंदोलनकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली. चार बसेसना आगीही लावल्या.

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच मारहाण करणार्‍या आंदोलनांवर लाठीमार केला. मथुरा रोडवर आंदोलनकर्ते शांततेत बसून आंदोलन करीत होते. त्याचवेळी पोलिस त्या ठिकाणी आले व त्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत हुज्जत घातली. आंदोलनकर्त्यांनी विरोध करताच पोलिसांनी लाठीमार सुरू केला, असा आरोप काँग्रेस विद्यार्थी संघटना एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सॅमन फारूखी यांनी पीटीआयशी बोलताना केला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले.

हिंसक आंदोलनाचा फटका मेट्रो स्टेशनला बसला आहे. दिल्ली मेट्रोने ट्विट केले. दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यानंतर मेट्रोने जामिया मिलिया इस्लामिया, ओखला विहार आणि जसोला विहाल शाहीन बाग मेट्रो स्टेशनवरील प्रवेश व बाहेर जाणारा रस्ता बंद केला आहे.

First Published on: December 16, 2019 5:25 AM
Exit mobile version