दिल्ली घटनेत नवीन खुलासा; ‘ते’ चौघेही दारू प्यायले होते

दिल्ली घटनेत नवीन खुलासा; ‘ते’ चौघेही दारू प्यायले होते

मद्यपी बापाने रागात मुलाच्या मांडीचा घेतला चावा

नवी दिल्लीः दिल्ली येथे तरुणीला जीप खाली फरफटत नेणारे चौघेही आरोपी घटनेच्या दिवशी दारू प्यायले होते, अशी माहिती रक्त चाचणीतून समोर आली आहे. दिल्ली येथील लॅबने हा अहवाल दिला आहे. त्यामुळे आरोपींवर दारू पिऊन वाहन चालवल्याचा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.

दिल्लीतील कांजवाला येथे बोलेरो जीपने अंजली सिंगच्या स्कुटीला धडक देऊन अंजलीला खाली पाडले. जीपमध्ये अडकलेल्या अंजलीला जीपने १३ किमी फरफटत नेले. यात अंजलीचा मृत्यू झाला. अपघातात अंजलीच्या अंगावरील सर्व कपडे फाटले. अंजलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांनी तपास करत तरुणीला धडक देणाऱ्या जीपमधील पाच आरोपींना अटक केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करुन या घटनेतील आरोपींना अटक केली.

त्यानंतर आरोपींच्या रक्ताचे नमून चाचणीसाठी घेण्यात आले. घटनेच्या दिवशी आरोपी दारु प्यायले होते की नाही याची माहिती घेण्यासाठी आरोपींच्या रक्ताची चाचणी करण्यात आली. आरोपींच्या रक्तात दारुचे प्रमाण आढळले असल्याचा अहवाल लॅबने दिला. तसेच घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या ११ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली गृहमंत्रालयाने पोलिसांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. कर्तव्यात कसूर केल्याचा या पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला.

दरम्यान, या घटनेत अंजलीच्या मागे बसलेल्या निधीचीही पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीत निधी गांज्याची तस्करी करायची, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. निधीला ६ डिसेंबर २०२० रोजी आगरा स्थानकावर पोलिसांनी अटक केली होती. तिच्याकडे १० किलो गांजा सापडला होता. याप्रकरणात तिला जामीनही मंजूर झाला आहे. घटनेआधी अंजली व निधीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. पैसे देण्यावरुन हे भांडण झाले होते, असे अंजलीच्या मित्राने पोलिसांना सांगितले आहे. या घटनेत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. ३१ डिसेंबर २०२२ रोजी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.

First Published on: January 13, 2023 8:50 PM
Exit mobile version