डॉल्फिनही ठेवतात मित्रांना ‘नावं’

डॉल्फिनही ठेवतात मित्रांना ‘नावं’

माणसांप्रमाणेच काही निवडक प्राणी-पक्षीसुद्धा आपापसांत संवाद साधतात. एकमेकांशी बोलण्यासाठी त्यांची एक ठराविक सांकेतिक भाषा असते. आजवर अनेक संशोधनांमधून ही बाब समोर आली आहे. डॉल्फिन मासा हा माणसाचा जवळचा मित्र असल्याचं सिद्ध झालं आहे. माणसांप्रमाणेच डॉल्फिनही आपापसांत संवाद साधत असतात. एका विशिष्ट प्रकारच्या आवाजात डॉल्फिन्स एकमेकांशी बोलतात. मात्र, यापलीकडे जाऊन डॉल्फीन संदर्भातला एक नवा आश्चर्यकारक शोध ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ स्टेफनी किंग जगासमोर आणला आहे.

मित्रांना ठेवतात ‘नावं’

माणसांप्रमाणेच आपापसांत बोलणारे डॉल्फिन्स चक्क आपल्या मित्रांना वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. नावात काय आहे? असा प्रश्न जरी शेक्सपिअरने जगाला विचारला असला, तरी ‘नाव’ हे प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र ओळख सिद्ध करत असतं. डॉल्फिन्सही बहुधा हे मानत असावेत. त्यामुळेच ते त्यांच्या मित्रांची आणि शत्रूंची ओळख डोक्यात पक्की ठेवण्यासाठी त्यांना विशिष्ट नावाने संबोधतात. किंग यांनी त्यांच्या संशोधनात ही बाब मांडली आहे.

फोटो सौजन्य- dailymail24.com

अशाप्रकारे साधतात संवाद

डॉल्फिन्स आपापसात संवाद साधतेवेळी एक विशिष्ट प्रकारची शीळ (शिट्टी) वाजवतात. मात्र, त्याव्यतिरिक्त प्रत्येक डॉल्फिनच्या मेंदूमध्ये अन्य डॉल्फिन्सची ओळख सांकेतिक नावांनी संग्रहित केली जाते. त्यातही प्रामुख्याने मित्र, शत्रू, नर आणि मादी या गटांत डॉल्फिन्स एकमोकांचं वर्गीकरण करत असतात. ज्यावेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक डॉल्फिन्स एकमेकांना भेटतात, तेव्हा ते सांकेतिक शिट्टी वाजवतात. एकाने घातलेली शीळ बाकीचे डॉल्फिन्स जशीच्यातशी लक्षात ठेवतात. त्यामुळे त्यानंतर कधीही ते परस्परांना भेटल्यास त्याच विशिष्ट सांकेतिक नावांनी (शिट्टीने) संबोधतात.

स्टेफनी किंग यांच्या म्हणण्यानुसार, माणसांप्रमाणे असं वर्गीकरण करण्याची बौद्धिक क्षमता केवळ डॉल्फिन्समध्येच असते. डॉल्फिन एकमेकांशी घनिष्ठ संबंध देखील प्रस्थापित करु शकतात आणि गरज पडल्यास दुरावाही निर्माण करु शकतात.

First Published on: June 22, 2018 4:15 PM
Exit mobile version