एकाही संन्याशाला भारतरत्न नाही हे दुर्भाग्य – रामदेव बाबा

एकाही संन्याशाला भारतरत्न नाही हे दुर्भाग्य – रामदेव बाबा

‘देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली तरी अद्याप एकाही संन्याशाला भारतरत्न मिळाले नाही, हे दुर्देव आहे’, अशी खंत योगगुरू रामदेव बाबा यांनी बोलून दाखवली आहे. सोबतच ‘सरकारने पुढीलवेळी एका तरी संन्याशाला भारतरत्न द्यावा’, असा आग्रहदेखील रामदेव बाबांनी केला आहे. ‘स्वामी विवेकानंदजी, महर्षी दयानंद सरस्वती किंवा शिवकुमार स्वामीजी यांच्यापैकी एकाला सरकराने भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा’, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलतेवेळी रामदेव बाबा यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी आगामी निवडणुकांविषयी प्रश्न विचारला असता रामदेव बाबा म्हणाले की, ‘२०१९ च्या निवडणुकांमध्ये काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाला जाती आणि धर्माच्या बंधनात अडकवू नका.’ ‘देशाला शैक्षणिक, आर्थिक आणि अन्य समस्यांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावं यासाठी संकल्प करण्यात यावा’, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.


राजकारणाला आयुष्यातून डिलीट केले

यावेळी बोलताना बाबा म्हणाले की, ‘दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला हवा. तसंच दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना अन्य सरकारी योजनांसाठीही अपात्र ठरवावे’. राजकारणाविषयी वैयक्तिक पातळीवर मत मांडताना बाबा रामदेव म्हणाले, की ‘मी राजकारणाला गेल्या अनेक दिवसांपासून आयुष्यातून डिलीट केले आहे. मात्र, देशाच्या राजकारणात सध्या युद्धाची परिस्थिती आहे. या युद्धात दोन्ही बाजूंनी दिग्गजच मैदानात उतरले आहेत. त्यामुळे कोण जिंकणार आणि कुणाचा पराभव होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ही लढत रंगतदार होणार आहे.’ याशिवाय ‘आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात गुंग झालेल्या सर्व पक्षीय राजकारण्यांना राजकारणातील मर्यांदाचा बहुधा विसर पडला आहे’, असा टोलाही रामदेव बाबा यांनी यावेळी लगावला.

First Published on: January 27, 2019 11:04 AM
Exit mobile version