तुर्कस्तान भूकंपातील मृतांचा आकडा 15 हजारांच्या पार; अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली

तुर्कस्तान भूकंपातील मृतांचा आकडा 15 हजारांच्या पार; अजूनही अनेक जण ढिगाऱ्याखाली

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत 15 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकट्या तुर्कस्तानमध्ये 9057 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर दुसरीकडे सीरियामध्ये 2662 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भुकंपामध्ये 34 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच, इमारतींच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी मदत आणि बचाव पथके रात्रंदिवस काम करत आहेत.

लोकांनी घेतला मशिदी, शाळा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आसरा

भूकंपामुळे बेघर झालेल्या लोकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच, पाऊस पडत असून बर्फवृष्टी होत आहे. आग्नेय तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये ७.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे बाधित झालेल्या बहुतेक लोकांनी मशिदी, शाळा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आश्रय घेतला आहे. विशेष म्हणजे बेघर झालेल्या लोकांसमोर अन्न व इतर समस्याही निर्माण झाल्या आहेत.

तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्त भागात आता सुमारे 60 हजार कर्मचाऱ्यांचे बचाव पथक काम करत आहेत. परंतु, बरेच लोक अजूनही मदत पोहोचण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी बुधवारी भूकंपग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी “आमच्या एकाही नागरिकांना आम्ही रस्त्यावर सोडणार नाही. पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जाईल. देशातील 8.5 कोटी लोकांपैकी 1.3 कोटी लोक प्रभावित झाले आहेत”, असे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी सांगितले.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येणार

आदिमान शहरातील ढिगार्‍यातून 10 वर्षीय बैतुल एडिसला मदत कर्मचार्‍यांनी बाहेर काढल्याने लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात बचावकर्त्यांचे स्वागत केले. दरम्यान, बचावकार्य पथकांनी आरिफ कान या तीन वर्षांच्या मुलाला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. मुलाचे वडील एर्तुग्रुल किसी यांना बचाव कर्मचार्‍यांनी आधीच ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. आपल्या मुलाला ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढून रुग्णवाहिकेत नेत असल्याचे पाहून वडिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

तुर्कीमध्ये एक भारतीय बेपत्ता, 10 इतर अडकले

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम), संजय वर्मा म्हणाले की, भूकंपानंतर दहा भारतीय तुर्कस्तानच्या दुर्गम भागात अडकले होते, मात्र ते सुरक्षित आहेत. आणखी एक नागरिक दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. तो माल्टामध्ये बिझनेस ट्रिपवर होता. आम्ही बेंगळुरूमधील त्यांच्या कुटुंबाच्या आणि कंपनीच्या संपर्कात आहोत. ते म्हणाले की, तुर्कीमध्ये 3 हजार भारतीय नागरिक आहेत. यापैकी सुमारे 1,850 इस्तंबूलमध्ये आणि 250 अंकारामध्ये राहतात.


हेही वाचा – फ्लिपकार्टवर बुक केला 87 हजारांचा कॅमेरा, पण पार्सलमध्ये आले दगडधोंडे

First Published on: February 9, 2023 1:16 PM
Exit mobile version