ममता बॅनर्जी सरकारमधील आणखी एक मंत्री ईडीच्या रडारवर; मनी लाँड्रिंगप्रकरणी पाठवली नोटीस

ममता बॅनर्जी सरकारमधील आणखी एक मंत्री ईडीच्या रडारवर; मनी लाँड्रिंगप्रकरणी पाठवली नोटीस

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी वाणिज्य मंत्री पार्थ चॅटर्जी आधीच तुरुंगात आहेत. त्यांची सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे त्यांची मैत्रीण अर्पिता मुखर्जीही तुरुंगात आहे. तिच्याकडून आत्तापर्यंत 50 कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली आहे. अशात आता ममता बॅनर्जी सरकारमधील आणखी एक मंत्री ईडीच्या रडारवर आले आहेत. आमदार माणिक भट्टाचार्य यांच्यानंतर आता कृष्णा कल्याणी यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

टीएमसीचे आमदार कृष्णा कल्याणी यांची कंपनी कल्याणी सॉल्व्हेक्स प्रायव्हेट लिमिटेडला मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण टीव्ही चॅनेल्सना दिलेल्या जाहिरातींशी संबंधित आहे. कृष्णा कल्याणी या कंपनीचे अध्यक्ष आहेत.

कृष्णा कल्याणी हे रायगंजचे आमदार आहेत, ते उत्तर दिनाजपूर येथील कल्याणी सॉल्व्हॅक्स कंपनीचे चेअरमन आहेत. ईडीने त्यांना 25 जुलै रोजी नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे ईडीने मागवली आहेत.   पत्रानुसार, हे प्रकरण कोलकत्ता टेलिव्हिजन चॅनेल आणि रोज टीव्हीला दिलेल्या जाहिरातींशी संबंधित आहे.

28 जुलै रोजी ममता बॅनर्जी सरकारने पार्थ चॅटर्जी यांना त्यांच्या सर्व मंत्रिपदावरून हटवल्यानंतर काही तासांनी अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना सर्व पक्षीय पदांवरून काढून टाकले तसेच तृणमूल काँग्रेसमधूनही निलंबित केले. चॅटर्जी यांना अटक केल्याने आणि अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून मोठी रोकड जप्त केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

या प्रकरणावरून भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षा सुकांता मजुमदार यांनी टीएमसी नेतृत्वावर टीका केली आहे. चटर्जी यांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अनेक लोक गुंतले आहेत. एकट्या पार्थ दा यांना काढून टाकल्याने टीएमसी वाचणार नाही. असे मजुमदार म्हणाले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले अभिनेते-राजकारणी मिथुन चक्रवर्ती यांनी चॅटर्जी यांना खरे बोलण्याचा सल्ला दिला. मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, मला वैयक्तिकरित्या असे वाटते की पार्थ चॅटर्जी केवळ (जप्त केलेल्या) संपत्तीचा रखवालदार होता. या लुटीमागे आणखी कोणाचा हात आहे. माकपा नेते विकास भट्टाचार्य यांनीही ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणा ममता बॅनर्जी मुख्य दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला.


गेल्या 17 वर्षात मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून 5 हजारांच्यावर खटले दाखल; केवळ 23 प्रकरणे निकाली

First Published on: July 29, 2022 6:09 PM
Exit mobile version