2000 रुपयांच्या नोटबंदीचा परिणाम; पेट्रोल पंपावरील रोखीच्या व्यवहारात वाढ

2000 हजार रुपयांची नोट लवकरच चलनातून बाद होणार आहे, अशी घोषणा आरबीआयकडून करण्यात आली आहे. पुढील चार महिन्यात नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. तर दैनंदिन जीवनात आता ही नोट वापरण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. पण अनेक व्यायसायिकांकडून ही नोट नाकारण्यात येत आहे. परंतु, पेट्रोल पंपावर ही नोट देण्यात येत असून ग्राहक मुद्दामहून ही नोट देत असल्याचे पेट्रोल पंपच्या मालकांकडून सांगण्यात आले आहे. (Effect of demonetisation of Rs 2000; Increase in cash transactions at petrol pumps)

हेही वाचा – आजपासून ‘नोटबदली’ ; 2000 ची नोट कशी बदलून घ्याल? जाणून घ्या सविस्तर

पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी ग्राहक हे 2000 रुपयांची नोट देत असल्याने पेट्रोल पंपावरील रोखीच्या व्यवहारात वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यामुळे पेट्रोल पंपावर ग्राहकांना सुट्टे पैसे देताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत बोलताना ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन या देशातील पेट्रोल पंप डीलर्सच्या सर्वात मोठ्या संघटनेकडून सांगिण्यात आले आहे की, 2000 रुपयांची नोट मागे घेण्याच्या आरबीआयच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा देशभरातील पेट्रोल पंपांवर 2016 च्या नोटाबंदीच्या वेळी जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच कठीण परिस्थिती आता निर्माण झाली आहे. 100 किंवा 200 रुपयांच्या छोट्या रकमेच्या पेट्रोल डिझेलच्या खरेदीसाठी देखील ग्राहक 2000 रुपयांच्या नोटा देत आहेत.

पूर्वी आम्हाला रोजच्या रोखीतील व्यवहारांमध्ये फक्त 10% रक्कम मिळत होती, परंतु आता आमच्या आउटलेटवर मिळणाऱ्या जवळपास 90% रोख फक्त 2000 रुपयांच्या नोटांच्या रूपात मिळत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या 2000 च्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्या लागतील ही अडचण ठरणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

पेट्रोल पंपावरील दैनंदिन विक्रीतील 40% वाटा असलेले डिजिटल पेमेंटचे प्रमाण 10% पर्यंत आले आहे. तर रोख विक्रीमध्ये गेल्या दोन दिवसांत वाढ झाली आहे. पण यामुळे डिलर्सला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर उद्भवलेल्या समस्यांसारखीच आताही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण 2016 नंतर बहुतांश डिलर्सना आयकराच्या नोटिसा, छापेमारी यांना कोणताही दोष नसताना सामोरे जावे लागले होते, अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे पेट्रोल पंप डीलर्सना कमी मूल्याच्या नोटा पुरेशा प्रमाणात पुरवण्यासाठी बँकांना सुचना देण्यात याव्यात, ज्यामुळे ते इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मुबलक प्रमाणात सुट्टे पैसे देऊ शकतील, अशी विनंती असोसिएशनकडून रिझर्व्ह बँकेला करण्यात आली आहे.

First Published on: May 23, 2023 3:12 PM
Exit mobile version