अमेरिका हिंसाचार: ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने ट्रम्प यांचं अकाऊंट केलं ब्लॉक

अमेरिका हिंसाचार: ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने ट्रम्प यांचं अकाऊंट केलं ब्लॉक

अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हार मानायला तयार नाहीत. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या विजयाची अधिकृतपणे निश्चिती झाल्यानंतरही ट्रम्पच्या हजारो समर्थकांनी हिंसक रूप धारण केलं आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून तोडफोड केली. जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच हा सर्व प्रकार घडला. या सर्व हिंसाचारानंतर फेसबुक आणि ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने डोनाल्ड ट्रम्प यांचं आकाऊंट तात्पुरतं बंद केलं आहे. ट्विटरने ट्रम्प यांचं अकाऊंट बारा तासासाठी ब्लॉक केलं आहे. तसंच ट्रम्प यांनी भविष्यात नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांचं अकाऊंट कायमचं बंद करु असा इशारा दिला आहे. ट्विटरने ट्रम्प यांना तीन ट्विट डिलीट करायला सांगितले आहेत, ज्यामुळे हिंसाचार झाला.

फेसबुक आणि इंस्टाग्रामने ट्रम्प यांचं अकाऊंट २४ तासांसाठी केलं ब्लॉक

फेसबुकनेही नियमांचं उल्लंघन केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचं पेज २४ तासांसाठी ब्लॉक करत असल्याचं सांगितलं आहे. तसंच इन्स्टाग्रामनेही २४ तासांसाठी अकाऊंट लॉक केलं आहे. अमेरिकेतील हिंसाचारानंतर ट्विटर आणि फेसबुकनेही ट्रम्प यांचे व्हिडिओ काढले ज्यात ते आपल्या समर्थकांना संबोधित करत होते. ट्रम्प यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये आपल्या समर्थकांना हिंसाचाराच्या वेळी अमेरिकेचं रक्षण करावं आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत घोळ झाल्याचं म्हटलं. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील ट्रम्प यांचे अकाऊंट पुढील २४ तास ब्लॉक करण्यात आलं आहे.

सत्ता परिवर्तन शांततेच्या मार्गाने व्हावं

“वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेली दंगली आणि हिंसाचाराबद्दल माहिती मिळाल्यानंतर मी खूप व्यथित आहे. सत्ता हस्तांतरण पद्धतशीर आणि शांततेत व्हायला हवं. बेकायदा निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होऊ नये,” असं पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत अमेरिकेतील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: January 7, 2021 12:36 PM
Exit mobile version