देशाचा अभिमान पायलट अभिनंदन भारतात परतला

देशाचा अभिमान पायलट अभिनंदन भारतात परतला

पाकिस्तानी एफ-१६ विमानाच्या हवेत चिंधड्या उडवणारा भारताचा ढाण्या वाघ भारतीय मिग-२१ विमानाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे शुक्रवारी रात्री ९.२० वाजता वाघा बॉर्डरवरून रुबाबात भारतात परतले. भारताच्या या वीरपुत्राचे स्वागत करण्यासाठी दुपारपासूनच तेथे जमलेल्या भारतीयांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात स्वागत केले. पाकिस्तानने जगाला आपले खोटे औदार्य दाखवण्यासाठी अभिनंदन यांच्या सुटकेला विलंब केला. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात देशात संतापाची भावना पसरली.

अभिनंदन वर्थमान पाकिस्तानमधून वाघा बॉर्डर येथे आले. त्यावेळी त्यांच्यासोबत पाकिस्तान हवाई दलाचे अधिकारी, पाकिस्तानच्या एक महिला अधिकारी आणि पाकिस्तानचे चार रेंजर होते. तर भारताच्या बाजूला सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी आणि हवाई दलाचे उच्चपदस्थ अधिकारी वाघा बॉर्डरवर हजर होते. पाकिस्तानी अधिकार्‍याने नोमॅन्स लॅण्डमध्ये येऊन भारतीय अधिकार्‍यांना कागदपत्रे दिली. त्यानंतर अभिनंदन यांना सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन वाघा बॉर्डर येथून भारतात आणले.

अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरला त्यांचे आई-वडील आणि लष्कराचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. अभिनंदन भारतात आल्याचे कळताच तेथे जमलेल्या भारतीयांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी मीडियाशी बोलताना व्हाईस एअर मार्शल आरजीके कपूर यांनी अभिनंदन भारतात आले असून त्यांची आता वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, असे सांगितले. मात्र त्यापेक्षा अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला.

अभिनंदन भारतात आल्याचे कळत देशभरात उत्साहाची लाट पसरली. देशात अनेक ठिकाणी फटाके वाजवून अभिनंदन यांचे स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी उत्साही तरुणांनी रस्त्यावर मिरवणूक काढली. दुपारपासून वाघा बॉर्डर येथे अभिनंदन यांच्या आगमनाची वाट पाहणारे लोक रात्री उशीरापर्यंत न थकता तेथे उपस्थित होते.

पाकचे शेपूट वाकडेच

अभिनंदन यांना पाकिस्तान दुपारी साडेतीनच्या सुमारास भारताच्या ताब्यात देणार होता. मात्र तोपर्यंत त्यांना बॉर्डरवर आणलेच नाही. उलट जगाला आपले कथित औदार्य दाखवण्यासाठी पाकिस्तानकडून अभिनंदन यांना सोडत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यातून आपण किती क्षमाशील आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्नही झाला. मात्र भारताकडून विचारणा केल्यावर अजून कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे खोटे कारण देण्यात आले. दुपारची रात्री झाली. अखेर रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी अभिनंदन यांना भारतात पाठवण्यात आले.

First Published on: March 2, 2019 6:00 AM
Exit mobile version