युपीमध्ये अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्यांनीच केला सामुहिक बलात्कार

युपीमध्ये अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्यांनीच केला सामुहिक बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्याच दरम्यान उन्नावमध्ये देखील एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली. तशाच घटनेची उत्तर प्रदेशात पुनरावृत्ती झाल्याचं समोर आलं आहे. बिजनौर जिल्ह्यातील शिवकाळा गावात एका १६ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ताहिर, सरफराज आणि नासीर या तरुणांना अटक करण्यात आली आहे.

शेजारीच राहणाऱ्या तरुणाने केला बलात्कार

बिजनौर जिल्ह्यातील शिवकाळा गावात राहणारी १६ वर्षीय पीडित मुलगी तिच्या शेजारी राहणाऱ्या ताहिरकडे स्वयंपाक घरातील काही वस्तू मागण्यासाठी गेली होती. याच दरम्यान ताहिरने तिला बहाण्याने घरात बोलावलं. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ताहिर व त्याच्या दोन मित्रांनी या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार केला. हा घडलेला प्रकार तिने घरी जाऊन आपल्या मोठ्या बहिणीला सांगितला. लागलीच पीडितेची मोठी बहीण जाब विचारण्यासाठी ताहिरच्या घरी गेली. मात्र तोपर्यंत ताहिर आणि त्याचे मित्र पळून गेले होते.

तक्रार दाखल करण्यास पोलिसांचा नकार

या अल्पवयीन मुलीच्या बहिणीने हा घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. या प्रकरणी ताहिर, सरफराज व नासीर या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती त्यांनी पोलिसांना केली. पोलिसांनी मात्र गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. अखेर हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतरच पोलिंसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन घेतला.

फाशीची शिक्षा देण्याचा कायदा

नुकताच केंद्र सरकारने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देणारा कायदा पारित केला. याव्यतिरिक्त अशा प्रकारे गंभीर कृत्य करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र तरीही या घटना कमी होण्याचं नाव घेत नाही येत.

प्रमुख आरोपी

आम्ही मुलीच्या कुटुंबाकडून दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारावर पुरावे गोळा करत आहोत. या प्रकरणातील ताहिर, सरफराज व नासीर हे प्रमुख आरोपी असून या तरुणांना अटक करण्यात आल्याची माहिती बिजनौरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश सिंग यांनी दिली.

First Published on: May 25, 2018 5:37 AM
Exit mobile version