गोव्यात विक्रमी 78.94 टक्के मतदान

गोव्यात विक्रमी 78.94 टक्के मतदान

देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात सोमवारी गोवा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात मतदान झाले. गोवा आणि उत्तराखंडसाठी एकाच टप्प्यात निवडणूक झाली. तर उत्तर प्रदेशात दुसर्‍या टप्प्यासाठी मतदान झाले. या तीनही राज्यातील संध्याकाळी 5 पर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यात विक्रमी 78.94 टक्के मतदान झाले. तर उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 पर्यंत 60.44 आणि उत्तराखंडमध्ये 59.37 टक्के मतदानाची नोंद झाली.

सोमवारी झालेल्या मतदानात तीनही राज्यात मिळून विधानसभेच्या 165 जागांसाठी 1 हजार 519 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. गोव्यातील 40 जागांसाठी एकूण 301 उमेदवार रिंगणात होते. गोव्यात भाजप, काँग्रेससह आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी आणि अन्य छोट्या पक्षांनीही नशीब आजमावले. उत्तराखंडमधील 70 जागांसाठी सोमवारी 82 लाख पेक्षा अधिक मतदारांनी 632 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये कैद केले आहे.

तर उत्तर प्रदेशाात दुसर्‍या टप्प्यात एकूण 9 जिल्ह्यात मतदान झाले. त्यात बिजनौर, सहारनपूर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदायू आणि शाहजहांपूर या जागांचा समावेश आहे. या 9 जिल्ह्यातील विधानसभेच्या 55 जागांसाठी मतदान झाले. यात 2 कोटी 2 लाख मतदारांनी सहभाग नोंदवला.

गोव्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
गोव्यात प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल अलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (जीएफपी), सुदीन ढवळीकर (एमजीपी), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि आपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

First Published on: February 15, 2022 5:03 AM
Exit mobile version