या गावात बँका नाही तर,साक्षात ‘हनुमान’ देत आहे गावकऱ्यांना लोन

आतापर्यंत आपण बँका लोन देत असल्याचं बघितलं आहे. किंबहुना आपणही कधी ना कधी बँकेतूनच लोन घेतलंही असेल. पण मध्यप्रदेशमधील रतलाम गावात मात्र एक आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. या गावात गावकरी बँकेतून नाही तर चक्क हनुमानाकडून कर्ज घेतात आणि फेडतातही.

रतलाम गावात एक पुरातन हनुमान मंदीर आहे. ३५ वर्षांपूर्वी शिवरात्रीच्या होमहवनासाठी गावकऱ्यांनी देणग्या गोळा केल्या. पण झालं असं की होम हवन व पूजाविधी करूनही बरेचसे पैसे शिल्लक राहीले. यामुळे एवढ्या पैशांचं करायचं काय असा प्रश्न मंदिर सदस्यांना पडला. त्यावेळी गावातील काही ज्येष्ठांनी पुढाकार घेत या पैशांचा गावातीलच लोकांना उपयोग होईल असे काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हे पैसे गावातील गरजूंना कर्ज म्हणजेच लोन म्हणून देण्याचा
निर्णय घेण्यात आला. त्यावर सगळ्यांचे सहमतही झाले. कर्ज वितरणासाठी एक समितीही तयार करण्यात आली. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागयत कायम आहे. वर्षाला दोन टक्के व्याजाने मंदिर प्रशासन हनुमानाच्या नावाने गरजू व्यक्तीला कर्ज देते. त्यासाठी यात कर्जदारांची आर्थिक परिस्थिती बघून वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यात गरीब व्यक्तीला १ हजार रुपये हनुमानाकडून दिले जाते. तर त्यापेक्षा जरा बरी आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीला २ हजार, मध्यमवर्गीय व्यक्तीला ३ हजार याप्रमाणे लोन दिले जात आहे. या गावातील जवळ जवळ सगळ्याच जणांनी हनुमानाकडून कर्ज घेतलेले आहे.

या कर्जाच्या व्याजाची जी रक्कम येते त्यातून मंदिरांवर खर्च केला जातो. गेल्या ३५ वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू असून हनुमानजीकडून कर्ज घेणे शुभ असल्याची काही गावकऱ्यांची भावना आहे. यामुळे काहीजण छोट्या खर्चासाठीही हनुमानाकडून कर्ज घेतात.

First Published on: June 24, 2021 1:59 PM
Exit mobile version