सरकारी बँक कर्मचारी २ दिवसांच्या संपावर

सरकारी बँक कर्मचारी २ दिवसांच्या संपावर

bank employees on strike from 30th may

बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि ‘इंडियन बँक्स असोशिएशन'(आयबीए) यांच्यात नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात केवळ २ टक्के वाढ करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरातील बँकांचे कर्मचारी येत्या ३० मे पासून दोन दिवसांच्या संपावर जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी घोषित केले आहे.

बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या वेतनात केवळ दोन टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव ‘आयबीए’ने लावून धरल्याने कर्मचारी संतापले. कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने (यूएफबीयू) दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली. ‘यूएफबीयू’च्या अंतर्गत नऊ कर्मचारी युनियन आहेत. त्यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन(एआयबीओसी), ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोशिएशन(एआयबीईए) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्लू) यांचा समावेश होतो.

थकीत कर्जांच्या वाढत्या ओझ्यामुळे बँकांच्या तोट्यात भर पडत आहे. त्यासाठी बँकांच्या कर्मचाऱ्यांना दोषी धरणे योग्य नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये बँक कर्मचाऱ्यांनी मुद्रा योजना, जनधन योजना, नोटाबंदी, अटल पेन्शन योजनेसाठी खूप काम केले आहे. त्यामुळे सध्या बँकांतील काम वाढले आहे, अशा परिस्थितीत चांगली पगारवाढ देण्याऐवजी केवळ २ टक्के पगारवाढ देऊन कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. असे कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.

बँकांच्या दोन दिवसीय संपामुळे पगारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होण्याची चिन्हं आहेत. ३० आणि ३१ मे रोजी बँकांनी पुकारलेल्या संपामुळे एटीएममध्येही खडखडाट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

First Published on: May 29, 2018 10:38 AM
Exit mobile version