जैशचे किती दहशतवादी ठार झाले, हे सांगणे आमचे काम नाही – हवाई दल प्रमुख

जैशचे किती दहशतवादी ठार झाले, हे सांगणे आमचे काम नाही – हवाई दल प्रमुख

भारतीय हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ

भारतीय वायूसेनेने बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती अतिरेकी ठार झाले हे सरकारतर्फे सांगण्यात येईल, आम्ही फक्त लक्ष्यावर हल्ला केला, असे स्पष्टीकरण वायूदलाचे प्रमुख बी. एस. धनुआ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ला झाल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय वायूसेनेने पाक व्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले, याची अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर वायूसेनेच्या प्रमुखांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही आकडेवारी सांगण्याचे काम सरकारचे असल्याचे स्पष्ट केले.

कोईम्बतूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हवाई दल प्रमुख धनोआ यांनी सांगितले की, आम्ही टार्गेट ठरवले आणि त्यावर हल्ला केला. आम्ही जर जंगलात बॉम्ब फेकले असते तर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आली असती का? आम्ही फक्त अचूक हल्ला केला. त्यात किती दहशतवादी मारले गेले, हे सांगण्याचे काम सरकारचे आहे. तसेच धनोआ म्हणाले की, ‘हवाई हल्ल्यासाठी मिग २१ हे विमान वापरण्यात आले होते. भारताच्या या लढाऊ विमानात आता बदल करण्यात आले आहेत. युद्धात याचा चांगला वापर होत आहे.’

हे वाचा – मी ‘नोबेल’ पुरस्कारासाठी पात्र नाही – इम्रान खान

‘पाकिस्तानने भारताविरोधात एफ १६ हे लढाऊ विमान वापरले होते, त्यामुळेच आम्हाला ते पाडावे लागले. या विमानाचे अवशेष भारतीय हद्दीत सापडले आहेत. जर पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये एफ १६ विमानाच्या वापराबाबत काही करार झाला आहे का? याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. मात्र करार झाला असताना जर पाकिस्तानने हे लढाऊ विमान वापरले असेल तर हे कराराचे उल्लंघन आहे’, असेही बधोआ म्हणाले. सीमेवर सध्या काय परिस्थिती आहे, याबद्दल धनोआ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणार नाही असे सांगितले.

First Published on: March 4, 2019 2:23 PM
Exit mobile version