शिवसेनेसारखी बंडखोरी काँग्रेसमध्येही होणार? गुलाम नबी आझाद यांचा मास्टरप्लान

शिवसेनेसारखी बंडखोरी काँग्रेसमध्येही होणार? गुलाम नबी आझाद यांचा मास्टरप्लान

नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये ५० वर्षे नेतृत्त्व केल्यानंतर पक्षातील अंतर्गत वादामुळे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मात्र, महाराष्ट्रात शिवसेनेत जशी फूट पडली तशीच फूट गुलाम नबी आझाद काँग्रेसमध्ये पाडायच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. काँग्रेसमध्ये १९९६ मध्ये नारायण दत्त तिवारी यांनीही अशीच फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचा प्रयत्न असफल ठरला.

१९९६ मध्ये नरसिंहा राव यांच्यासोबत मतभेद झाल्यानंतर नारायण दत्त तिवारी आणि अर्जून सिंह यांनी वेगळा पक्ष स्थापन केला. १९९६ च्या निवडणुकाही या पक्षांतून लढवल्या. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपयश आलं. त्यानंतर, सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर नारायण तिवारी आणि अर्जून सिंह काँग्रेस पक्षात परतले. त्यामुळे गुलाम नबी आझादसुद्धा असंच काहीतरी करतील, असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय.

हेही वाचा – राहुल गांधीना यशस्वी नेता बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण…, गुलाम नबी आझादांची खंत

दरम्यान, महाराष्ट्रातही नाट्यमय सत्तांतर घडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला आव्हान करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेनेतच फूड पाडून भाजपासोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्या बाजूला वळवून आपणच मूळ शिवसेना असल्याचा दावा केलाय. गुलाम नबी आझादही काँग्रेसमधील बड्या नेत्यांना गळाला लावण्याच्या तयारीत आहे. आनंद शर्मा, शशी थरूर, भुपेंद्र हुडा, मनीष तिवारी आणि बिहारचे राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह आदी नेते काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारी असल्याचं बोललं जात आहे. या नेत्यांसह गुलाम नबी आझाद काँग्रेस पक्षात फूट पाडण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष घराणेशाहीतून आलेले पक्ष आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखीच फूट काँग्रेसमध्येही होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

हेही वाचा – गुलाम नबी आझाद यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या ‘या’ 5 नेत्यांनी सोडला पक्ष

गुलाम नबी आझाद नवा पक्ष स्थापन करणार आहेत. मात्र, कधी स्थापन करणार याबाबत काहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु, २०२४ च्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते कधीही नवा पक्ष स्थापन करू शकतील.

काँग्रेसमध्ये आधीपासूनच अध्यक्षपदाचा तिढा आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार यावर मंथन सुरू आहे. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. यावेळी गांधी कुटुंबाबाहेरचा व्यक्ती अध्यक्षपदी बसणार की गांधी कुटुंबातील व्यक्ती अध्यक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र, अनेकांनी राहुल गांधींनाच अध्यक्ष होण्याची गळ घातली आहे. गांधी कुटुंबाबाहेरील नेत्यासाठी मल्लिकार्जून खर्गे, अशोक गेहलोत आणि गेहलोत यांचं नाव चर्चेत आहे. मात्र, यांच्यापैकी कोणी अध्यक्ष बनल्यास पक्षातील इतर नेते नाराज होऊन पक्ष सोडून जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

First Published on: August 30, 2022 6:45 PM
Exit mobile version