गुरुग्राम हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपीचा जामिन अर्ज फेटाळला

गुरुग्राम हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपीचा जामिन अर्ज फेटाळला

गुरुग्राम हत्येप्रकरणी अटक आरोपी (सौजन्य-हिंदूस्थान टाईम्स)

गुरुग्राममधल्या रायन इंटरनॅशनल शाळेतील दुसरीतल्या मुलाच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचा जामिन अर्ज आज पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती दया चौधरी यांच्या खंडपीठाने आज सकाळी हा निर्णय दिला. सात वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी हा अल्पवयीन आरोपी मागील सात महिन्यांपासून जामिन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी त्याने गुरुग्राम न्यायालयात जामिन अर्ज केला होता मात्र न्यायाधिशांनी त्याचा अर्ज फेटाळला.

अल्पवयीन आरोपीची कसून तपासणी
गुरुग्राम न्यायालयाने सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ला ४ जुलै पर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. सदर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायाधीश जसबीर सिंग कुंडू यांनी सीबीआयला मुदतवाढ करुन दिली होती. अटक अल्पवयीन आरोपीची चौकशी एका प्रौढ गुन्हेगारासारखी होत असल्याचा दावा विशेष बाल न्यायालयाद्वारे केला गेला. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळत आपला निर्णय कायम ठेवला आहे.

सीबीआय तपासामुळे मिळाले वेगळे वळण
गुरुग्राम येथील एका प्रसिद्ध शाळेत शिकत असलेल्या सात वर्षीय मुलाचा मृतदेह शाळेच्या प्रसाधन गृहात आढळला. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी आठ तासांमध्ये अशोक कुमार या (शाळेच्या) बस कंडक्टरला अटक केली. मात्र नंतर हा तपास २२ सप्टेंबर रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने केलेल्या तपासात या लहान मुलाची हत्या त्याच शाळेत शिकत असलेल्या १६ वर्षाच्या मुलाने केले असल्याचे समोर आले. दरम्यान सीबीआयने कंडक्टरला दोषमुक्त करण्याची कोर्टाकडे मागणी केली होती. या संबधी आरोपपत्र ५ फेब्रुवारी रोजी सीबीआयतर्फे सादर करण्यात आले. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कुमारला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्त करण्यात आले.

First Published on: June 6, 2018 1:41 PM
Exit mobile version